टॅक्स रिफंडच्या नावाखाली फसवणुकीची भीती, आयकर विभागाचा ‘अ‍ॅलर्ट’

आयटीआर फाईल दाखल करणाऱ्या अनेकांना आता टॅक्स रिफंडच्या नावाखाली फेक मेसेज येत आहेत. या मेसेजला बळी पडू नका, असा ‘अ‍ॅलर्ट’ आयकर विभागाने आपल्या करदात्यांना दिला आहे. देशात कोट्यवधी लोकांनी आयटीआर फाईल दाखल केली आहे. 31 जुलै 2024 ही आयटीआर फाईल दाखल करण्याची अखेरची तारीख होती, परंतु आता काही स्पॅमर्स याचा गैरफायदा घेत असून करदात्यांना टॅक्स रिफंडच्या नावाखाली गंडा घालत आहेत.

इन्कम टॅक्स विभागाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून यासंबंधी माहिती शेअर केली आहे. आयकर विभागाने कोणत्याही टॅक्स पेयर्संना कॉल किंवा पॉप अप मेसेजद्वार संपर्क केलेला नाही. जर कोणालाही यासारखा मेसेज आला असेल तर तत्काळ त्यांनी आयकर विभागाला याची माहिती द्यावी, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. टॅक्स रिफंडच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे करदात्यांनी अ‍ॅलर्ट राहावे. असेही आयकर विभागाने म्हटले आहे.

ओटीपी आणि बँक डिटेल्स शेअर करू नका

आयकर विभागाने अ‍ॅलर्ट जारी करताना म्हटले की, टॅक्स रिफंडच्या नावाखाली काही माहिती भरण्यास सांगितली जात आहे, परंतु याला बळी पडू नये. कोणताही संशयित मेसेज आढळल्यास याची तक्रार आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करावी. कोणत्याही अनोळखी मेसेजवर विश्वास ठेवू नका. आपली स्वतःची खासगी माहिती, ओटीपी, बँक डिटेल्स, पॅन नंबर, आधार नंबरची माहिती कोणासोबतही शेअर करू नका. तसेच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. आपल्या टॅक्सचे पे केवळ अधिकृत वेबसाईटवर जाऊन करावे, असे आवाहन केले आहे.