
आयकर विभागाचा भोंगळ कारभार उघड करणारी घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब कुटुंबाला 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नासाठी आयकर विभागाने नोटीस धाडली आहे. नोटीस पाहताच कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सदर नोटीस घेऊन पीडित कुटुंब सरकारी कार्यालयात पायपीट करत आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे हे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
लखीमपूर शहराला लागून असलेल्या खेरी टाउनमधील मोहल्ला कटरा येथे सईद आणि त्यांचे कुटुंब राहते. आयकर विभागाने सईदला धाडलेल्या नोटीसमध्ये तो एका वर्षात 9,30,57,939 रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र सईद मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात. तसेच त्यांच्याकडे स्वतःचे घर देखील नाही. ते एका भाड्याच्या झोपडीत कुटुंबासह राहतात. 9 कोटींहून अधिक रकमेची नोटीस मिळाल्यानंतर सईदच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. ते सतत सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारत आहेत.
बँकेने केवायसीसाठी कागदपत्रे मागितली होती. त्यासाठी त्यांनी त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर केले होते. त्यानंतर ही फसवणूक झाली असावी अशी शक्यता सईदने बोलून दाखवली. फसवणूक करणाऱ्याला कठोर शिक्षा द्यावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी सईद यांनी केली आहे.