पावसाअभावी भाजीपाल्यांची आवक घटल्याने भाव कडाडले

58

सामना प्रतिनिधी । परभणी

पावसाळा सुरु होऊन दिड महिन्याचा कालावधी लोटला तरी पालेभाज्यांचे भाव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. उन्हाळ्यापेक्षाही पावसाळ्यात भाजीपाल्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. पावसाअभावी भाजीपाल्यांची आवकच बाजारपेठेत घटली आहे. परिणामी सर्वच पालेभाज्यांचे भाव दुप्पटीने वाढले आहेत. पावसाळा सुरु होऊन तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही परिस्थिती कायमच असल्याचे चित्र दिसून येत आहे. संपूर्ण जिल्ह्याला समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे.

शहरातील भाजी मार्केटमध्ये शेपू ६० रुपये किलो, चुका व पालक १० रुपयाला जुडी, टोमॅटो ६० रुपये किलो, दोडका ८० रुपये किलो, पुâलकोबी ८० रुपये किलो, हिरवी मिरची ८० रुपये किलो, शिमला मिरची ६० रुपये किलो, काकडी ४० रुपये किलो, लसूण १२० रुपये किलो, पानकोबी ६० रुपये किलो, भेंडी ६० रुपये किलो, गवार ४० रुपये, कारले ८० रुपये किलोने विक्री होत आहे. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याने ग्राहकांनी भाजीपाला खरेदी करताना आखडता हात घेतला आहे. शेतकरी भाजीपाला बाजारात विक्रीसाठी आणतात त्याचवेळी भाजीपाल्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागतो. तसेच काहीवेळा शेतकऱ्यांना भाजीपाल्याला मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ येते. तसेच काहीवेळेला भाव न मिळाल्याने भाजीपाला मार्केटमध्येच फेकून द्यावा लागतो. परंतु, आजघडीला माकटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळू लागला आहे.

कोथिंबीरीने गाठला उच्चांक
प्रत्येक भाज्यांमध्ये कोथिंबीरीचा हमखास वापर केला जातो. मागील आठ दिवसांपासून बाजारपेठेत कोथिंबीरची आवक कमी झाल्याने २०ते २५ रुपये छटाक तर ३०० ते ४०० रूपये किलोप्रमाणे कोथिंबीर विक्री होत आहे. कोथिंबीरचे भाव गगनाला भिडल्याने स्वयंपाक घरातून कोथिंबीर जवळपास हद्दपार झाली आहे. कोथिंबीरविना भाजी खाण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या