
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
सुमार क्षेत्ररक्षण… अखेरच्या षटकांत गोलंदाजांचा फ्लॉप शो… अन् मधल्या फळीची समस्या… ही स्टोरी हिंदुस्थानी क्रिकेट संघाची. 30 मेपासून इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱया वन डे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला आपल्या संघाची चाचपणी करण्यासाठी उद्या अखेरची संधी असणार आहे. वन डे मालिका जिंकण्याचे आव्हानही विराट कोहलीच्या सेनेसमोर असणार आहे. मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड या स्टार खेळाडूंची अनुपस्थिती, डेव्हिड वॉर्नर व स्टीवन स्मिथचा अभाव असतानाही कांगारूंनी ट्वेण्टी-20 मालिका जिंकल्यानंतर वन डे मालिकेतही झोकात पुनरागमन केले आहे. त्यामुळे आता 2-2 अशा बरोबरीनंतर आजची लढत जिंकून कोणता संघ मालिका खिशात घालतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
रिषभ पंतला चुणूक दाखवावी लागेल
युवा यष्टिरक्षक रिषभ पंत याच्याकडून चौथ्या लढतीत क्षेत्ररक्षणात चूक झाली. त्यानंतर क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर टीका करण्यात आली, मात्र महेंद्रसिंह धोनीशी त्याची तुलना करू नका असे मत क्रीडातज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. तरीही रिषभ पंतला अखेरच्या वन डेत आपली चुणूक दाखवावीच लागणार आहे. वर्ल्ड कपसाठी त्याला हिंदुस्थानी संघात स्थान मिळेल की नाही याबाबत सांगणे कठीण आहे, पण त्यानंतरही त्याला संघात स्थान मिळवायचे असल्यास ही लढत महत्त्वाची ठरणार आहे.
या खेळपट्टीत दडलंय काय…
दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमची खेळपट्टी ही संथ म्हणूनच ओळखली जाते. त्यामुळे या खेळपट्टीवर कुलदीप यादव युजवेंद्र चहल यांच्या फिरकीची जादू चालल्यास आश्चर्य वाटायला नको. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियामधील अखेरच्या वन डे दरम्यान तेथे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे.
दृष्टिक्षेपात
ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानात 2009 साली द्विपक्षीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर कांगारूंना हिंदुस्थानात वन डे मालिका जिंकता आलेली नाही. तसेच 0-2 अशा फरकाने पिछाडीवर राहिल्यानंतर त्यांना मालिकाही जिंकता आलेली नाही.
2020 सालापासून वन डे लीगचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या होत असलेली पाच सामन्यांची वन डे मालिका ही अंतिम असणार आहे. वन डे लीगमध्ये दोन देशांमध्ये फक्त तीनच सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येईल.
चौथ्या क्रमांकाचा शोध…
विराट कोहलीला अंबाती रायुडूच्या रूपात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सापडला असला तरी प्रत्यक्षात त्याच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. त्यामुळे सौरभ गांगुलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱया फलंदाजांचा शोध आयपीएलमध्येही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. उद्याच्या एका लढतीने या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे लोकेश राहुल, अंबाती रायुडू यांच्यापलीकडेही कोणालाही संधी मिळू शकते असे म्हणायला सध्या तरी हरकत नाही.
संभाव्य उभय संघ खालीलप्रमाणे
हिंदुस्थान – शिखर धवन, रोहीत शर्मा, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल/अंबाती रायुडू, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, भुवनेश्वरकुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया – उस्मान ख्वाजा, ऍरोन फिंच (कर्णधार), शॉन मार्श, पीटर हॅण्डस्कोम्ब, ग्लेन मॅक्सवेल, ऍश्टन टर्नर, ऍलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, नॅथन लायन, जाय रिचर्डसन, ऍडम झाम्पा.




























































