कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळविल्यानंतर हिंदुस्थानचा युवा संघ बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतही विजयाचं सोनं लुटण्यासाठी सज्ज झाला आहे. आधीच 2-0 ने मालिका जिंकल्यामुळे औपचारिकता म्हणून खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात हिंदुस्थान आपल्या नव्या चेहऱयांसह बांगलादेशचा फडशा पाडणार, हे निश्चित आहे. दिग्गज खेळाडूंना बाकावर बसवून नवोदितांना खेळाडूंना संधी देण्याची शक्यता असल्यामुळे दिल्लीचा भेदक वेगवान गोलंदाज हर्षित राणा पदार्पण करताना दिसू शकतो. हिंदुस्थानचे खेळाडू सरस असल्यामुळे हैदराबादमध्ये प्रथम फलंदाजीला उतरल्यास धावांचा पाऊस पडणार, हे स्पष्ट आहे. फक्त वरुणराजाची कृपा राहायला हवी.
हर्षित राणाला पदार्पणाची संधी
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या हर्षित राणाला झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पणाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या मालिकेत तो संघाबाहेरच राहिला होता. मात्र आता बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकल्याने उद्याच्या सामन्यात राणा गोलंदाजी करताना हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना दिसू शकतो.