आता जिंकायचंच हाय! मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हिंदुस्थानी संघाचे सर्वस्व पणाला; बुमराच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी संघाची आजपासून पुन्हा कसोटी

आता हिंदुस्थानी संघाला मालिका जिंकण्याची संधी उरलेली नाही. मात्र मालिका बरोबरीत सोडवून आपला मान राखण्यासाठी आता जिंकावंच लागणार आहे. जिंकलो तर मालिकेत बरोबरी, हरलो किंवा कसोटी अनिर्णित राहिली तर पहिली अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफी इंग्लंडच्या नावावर. हिंदुस्थानी संघासाठी ‘इकडे आड तर तिकडे विहीर.’ त्यातच हिंदुस्थानी गोलंदाजीचा कणा असलेल्या जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत संघाची पुन्हा एकदा कसोटी आहे. बुमराच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी संघ कुलदीप यादवला सामावून घेण्याचे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत ओव्हलवर हिंदुस्थानचे फिरकीस्त्र घोंगावण्याची गंभीर तयारी सुरू आहे. अंतिम निर्णय नेहमीप्रमाणे नाणेफेकीच्या वेळीच घेतला जाईल.

हिंदुस्थानी संघासाठी एकच चांगली गोष्ट आहे की, ओव्हलवर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत हिंदुस्थानने विजय नोंदवला होता. हीच काही ती समाधानाची बाब असली तरी त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी हिंदुस्थानी संघाने नव्या रणनीतीसह उतरण्याची सर्व तयारी केली आहे. मँचेस्टरमध्ये हिंदुस्थानी संघाने झुंजार खेळ करत कसोटी अनिर्णित राखली, पण मानसिकदृष्टय़ा हा एक विजयच होता. कसोटी अनिर्णितावस्थेत सुटल्याचा इंग्लिश संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. पाचव्या कसोटीपूर्वी त्यांची मानसिकता मँचेस्टरमध्ये हरल्यासारखीच होती.

इंग्लंड संघात होलसेल बदल

इंग्लंड संघ आता मालिकेत हरणार नाही, याची कल्पना असल्यामुळे ओव्हल कसोटीसाठी त्यांनी संघात होलसेल बदल केले आहेत. कर्णधार बेन स्टोक्सने दुखापतीमुळे कसोटीतून माघार घेत नेतृत्वाचे बॅटन ओली पोपच्या हातात सोपवलेय. तर संघात जेकब बेथेल हा युवा फलंदाज पदार्पणासाठी सज्ज झालाय. तसेच गस अॅटकिन्सन,

जॅमी ओव्हरटन आणि जॉश टंग असे चार बदल केले आहेत. त्यांनी लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर या तिन्ही गोलंदाजांना विश्रांती देत एकही संधी न मिळालेल्या चौघांना संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.

बुमराच्या जागी अर्शदीपचा मारा

फक्त तीनच कसोटी खेळणार असे आधीच जाहीर करण्यात आलेल्या जसप्रीत बुमराला महत्त्वाच्या ओव्हल कसोटीत विश्रांती देण्यात आलीय. मात्र त्याच्या जागी अर्शदीप सिंहला कसोटी पदार्पणाची संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. अर्शदीपसह कुलदीप यादवलाही मालिकेत एकही संधी मिळाली नव्हती, मात्र ओव्हल हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन फिरकीस्त्रासह उतरण्याची तयारी करतोय. शार्दुल ठाकूरऐवजी कुलदीप यादवचे संघातील स्थानही जवळजवळ पक्के मानले जात असले तरी त्याचा निर्णय शेवटच्या क्षणीच घेतला जाणार आहे. 30-40 धावांसाठी संघाची फलंदाजी खोलवर करणाऱया गंभीरवर जोरदार टीका करण्यात येतेय. त्यामुळे ओव्हलवर कुलदीपला आपल्या फिरकीची कमाल दाखवण्याची संधी मिळू शकते. तसेच आकाश दीप पुन्हा संघात परतेल. म्हणजेच तीन वेगवान गोलंदाजांसह तीन फिरकी गोलंदाज असा सहा गोलंदाजांचा ताफा हिंदुस्थानी संघात असेल. ओव्हलवर विजय मिळवण्यासाठी हिंदुस्थानी संघ शेवटच्या फिरकीअस्त्राचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. कारण आता हरायचं नाय, फक्त जिंकायचंच हाय.

असा असेल अंतिम संघ

हिंदुस्थान संघ – यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह. इंग्लंड संघ – झॅक क्रावली, बेन डकेट, ओली पोप (कर्णधार), हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जॅमी स्मिथ, ख्रिस व्होक्स, गस अॅटकिन्सन, जॅमी ओव्हरटन, जॉश टंग.