वर्ल्ड कपपूर्वीचा आज शेवटचा रणसंग्राम, जिंकूनच मैदान सोडण्याचा हिंदुस्थान-न्यूझीलंडचा निर्धार

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

ग्रीनफिल्ड स्टेडियमवर  शनिवारी क्रिकेटचा सामना नाही, तर वर्ल्ड कपपूर्वीची शेवटची रंगीत तालीम खेळली जाणार आहे. मालिकेचा निकाल जरी ठरलेला असला तरी या लढतीला औपचारिकतेचा लवलेशही नाही. कारण वर्ल्ड कपमध्ये उतरताना जिंकण्याचा आत्मविश्वास गाठीशी बांधूनच मैदानात उतरायचा, हा हट्ट हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी धरलेला आहे. त्यामुळे शेवटचा पेपर कोण यशस्वीपणे सोडवत वर्ल्ड कपच्या मोहिमेवर चढाई करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हिंदुस्थानच्या गोटात चित्र बरंचसं स्पष्ट आहे. सर्वोत्तम अकराचा आराखडा जवळपास ठरलेला असतानाच मागील सामन्यात थोडेसे प्रयोग झाले. हर्षित राणाला सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आले तर वरुण चक्रवर्तीला विश्रांती देण्यात आली. पण आता प्रयोगांची वही भरली आहे. वर्ल्ड कपच्या उंबरठय़ावर उभे असताना स्थैर्य, लय आणि आत्मविश्वास यांनाच प्राधान्य असणार, हे स्पष्ट झालेय.

न्यूझीलंडची गाडी मात्र अजूनही थोडीशी हेलकावत आहे. योग्य संघरचना, दुखापतींचा फटका आणि खेळाडूंची उपलब्धता, या सगळ्या कसरतींमध्ये ते अडकले आहेत. त्यामुळे प्रयोगांपेक्षा स्पष्ट भूमिका आणि दमदार कामगिरीची त्यांना जास्त गरज आहे. याच कारणासाठी फिन अॅलनला संघात घेतले गेले आहे. बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजांची झोप उडवणारा हा फलंदाज हिंदुस्थानी परिस्थितीशी जुळवून घेणे, हाच न्यूझीलंडसाठी आजचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे.

हिंदुस्थानच्या दृष्टीने मात्र सगळ्यात मोठा प्रश्न एकच आहे तो म्हणजे संजू सॅमसन. शुभमन गिलची जागा शेवटच्या क्षणी सॅमसनला देण्यात आली. कारण गिलची बॅट शांत होती. पण संघ व्यवस्थापनाला आता ‘बदल केला आणि तोही फसला’ अशी परिस्थिती नकोय. सॅमसनसाठी ही लढत खास असेल, कारण तो घरच्या मैदानावर खेळतोय. तुडुंब भरलेले स्टॅण्ड्स, आपलेच प्रेक्षक आणि अपेक्षांचा भार, या सर्वांना धावांनी उत्तर देण्याची हीच वेळ आहे.

या सामन्यात प्रकाशझोतात दोन खेळाडू असतील. एक म्हणजे न्यूझीलंडकडून डेव्हन कॉनवे आणि हिंदुस्थानकडून ईशान किशन. कॉनवेने आतापर्यंत सलामी केली आहे, पण फिन अॅलन आल्यावर त्याची भूमिका नेमकी काय, हा प्रश्न आहे. दुसरीकडे, दुखापतीमुळे मागील सामना चुकवलेला ईशान किशन फिट असेल, तर हिंदुस्थान त्याला पुन्हा सलामीला उतरवणार का, हा मोठा पेच आहे. किशन सध्या अशा फॉर्ममध्ये आहे की, संघ व्यवस्थापनालाही त्याला बाहेर बसवणं अवघड जाईल.

वर्ल्ड कपपूर्वी धोका नको म्हणून अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली असावी. पण आज तो परततो का, यावर अजूनही पडदा आहे. ईशान किशनच्या दुखापतीची नेमकी स्थितीही सामन्याआधीच स्पष्ट होईल. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमला वर्ल्ड कपपूर्वी संधी मिळते का, याकडेही उत्सुकतेने पाहिले जातेय.

तिरुवनंतपुरमची खेळपट्टी हिंदुस्थानसाठी शुभ ठरलेली आहे. या मैदानावर झालेले मागील दोन्ही टी-20 आंतरराष्ट्रीय सामने हिंदुस्थानने जिंकलेत. एकदा धावांचा डोंगर उभारत, तर एकदा दक्षिण आफ्रिकेला अगदी थंडीत गुंडाळत हिंदुस्थान विजयी ठरला आहे. थोडक्यात सांगायचं तर हा सामना औपचारिक नाही, तर वर्ल्ड कपपूर्वीची अंतिम कसोटी आहे. जिंकून आत्मविश्वास कमावायचा, संघरचना भक्कम करायची आणि प्रतिस्पर्ध्यांवर मानसिक दबदबा टाकायचा. हेच दोन्ही संघांचे ध्येय आहे. आज जो संघ जिंकेल, तो फक्त सामना नाही, तर वर्ल्ड कपसाठीची पहिली मानसिक लढाई जिंकेल.