
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. टीम इंडियाचे फलंदाज आल्या पावली तंबूत परतत असताना यशस्वी जयस्वालने सलामीला येत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला आणि 58 धावांची अर्धशतकीये खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था सध्या बिकट आहे. दरम्यान, यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीतले 13 वे अर्धशतक साजरे करत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
यशस्वी जयस्वाल जुलै 2023 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. जयस्वालने 52 डावांमध्ये 20 वेळा 50 हून अधिक धावा करण्याची किमया साधली आहे. तसेच WTC मध्ये सलामीला येत 50 हून अधिक धावा करणारा तो हिंदुस्थानचा पहिला आणि जगातला दुसरा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने जॅक क्रॉली आणि उस्मान ख्वाजा यांना मागे टाकलं आहे. या क्रमवारील दिमुथ करुणारत्ने 21 अर्धशतकांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यावर दक्षिण आफ्रिकेने मजबूत पकड निर्माण केली आहे. यशस्वी जयस्वाल व्यतिरिक्त इतर कोणत्याच फलंदाजाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाची दयनीय अवस्था केली आहे. केएल राहुल (22), साई सुदर्शन (15), ऋषभ पंत (7), रविंद्र जडेजा (6), नितीश कुमार रेड्डी (10) आणि ध्रुव जुरेल भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था सध्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा अशी आहे. वॉशिंग्टन सुंदर (26*) आणि कुलदीप यादव (11*) नाबाद फलंदाजी करत आहेत. अजूनही टीम इंडिया 325 धावा मागे आहे.
























































