
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मूमध्ये सक्रिय असलेले दहशतवादी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे गुप्तचर विभागाने दिल्लीसह पंजाब आणि जम्मू कश्मीरला अलर्ट जारी केला आहे.
हल्ला स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी होईल असे नाही. कारण त्या दिवशी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असते. मात्र एक-दोन दिवसात दहशतवादी हल्ला करू शकतात, असे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. जम्मू काश्मीरमध्ये कठुवामध्ये पाहिलेले दोन संशयित दिल्लीच्या दिशेने गेलेची दाट शक्यता आहे. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. ही संशयित पठाणकोटच्या दिशेने गेले आहेत आणि तिथून दिल्लीच्या दिशेने येऊ शकतात. एवढेच नाही तर सुरक्षा दल आणि यंत्रणांना संशय आहे की, दहशतवादी अमरनाथ यात्रेवरही निशाणा साधू शकतात. त्याव्यतिरिक्त दिल्लीच्या प्रतिष्ठित संस्थांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. मागच्या अनेक वर्षांपासून सुरक्षा दल आणि यंत्रणांना दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यात यश येत आहे.
गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात. हा अलर्ट अशावेळी जारी करण्यात आला आहे की, जेव्हा काश्मीरच्या तुलनेत शांततापूर्ण असलेल्या जम्मू विभागात दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. कठुआ, डोडा, उधमपूर आणि राजौरी या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. आता हे दहशतवादी पंजाब आणि दिल्लीच्या दिशेने जाऊ शकतात, असा इशारा अलर्टमध्ये देण्यात आला आहे.