
पाकिस्तानने चिनी बनावटीच्या क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. यात दूरवर मारा करणाऱया रॉकेट्सचा, यूएव्ही ड्रोन्सचा तसेच चिनी बनावटीच्या काही कॉप्टर्स आणि ड्रोन्सचा समावेश होता. हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने चीनच्या क्षेपणास्त्रांच्या ठिकऱया उडवल्या आणि तुर्किचे ड्रोन्स हाणून पाडले, अशी माहिती तिन्ही दलांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन दिली.
पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आम्हाला उत्तर द्यावे लागले. यात त्यांचे जे काही नुकसान झाले त्याला सर्वस्वी पाकिस्तानी सैन्य जबाबदार असल्याचे एयर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी सांगितले. हिंदुस्थानी लष्कराच्या तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरचे बारकावे सांगतानाच पाकिस्तानकडून मोठय़ा संख्येने ड्रोन हल्ले करण्यात येऊनही हिंदुस्थानने ते कसे निष्प्रभ केले याची सविस्तर माहिती दिली. ‘याचना नही अब रण होगा…’ या राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ओळींतून लष्कराने किस्तानला दम भरला.
गेल्या काही वर्षांत दहशतवाद्यांच्या कारवाईच्या पद्धतीत बदल होताना दिसत होता. आपल्या लष्करासोबतच सामान्य नागरिकांवरही हल्ले होऊ लागले. 2024 मध्ये जम्मूत शिवकोरी मंदिरात जाणारे प्रवासी आणि या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांचा बळी या भयंकर बदलाचेच उदाहरण आहेत. पहलगाम हल्ल्यापर्यंत दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला होता, असे लेफ्टनंट जनरल घई म्हणाले.
अनेक स्तरांची सुरक्षा यंत्रणा
आंतरराष्ट्रीय सीमेपासून आत बसवण्यात आलेल्या अनेक स्तरांच्या सुरक्षा यंत्रणेमुळे पाकिस्तानचे हल्ले सहज परतवण्यात आले असे लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले. रडार, मानवरहित हवाई यंत्रणा, त्यामागे शोल्डर फायर्ड शस्त्र, त्यानंतर विंटेज एअर डिफेन्स शस्त्र आणि शेवटी आपली अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम होती. त्यामुळे पाकिस्तानला ही अनेक स्तरांची सुरक्षा व्यवस्था पार करून आपल्या हवाई तळांवर हल्ला करण्याची संधीच मिळाली नाही, असे घई यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हिंदुस्थानी हवाई दलाचे पायलट रात्रंदिवस युद्धासाठी, पाकिस्तानचे हल्ले परतवून लावण्यासाठी तयार होते, असे व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांची कल्पना होती
पाकिस्तानकडून हवाई हल्ले केले जातील, याची आधीच कल्पना होती, असे घई म्हणाले. दहशतवाद्यांवर आपले पेंद्रीत हल्ले नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा पार न करता करण्यात आले होते. आम्हाला पूर्ण कल्पना होती की पाकिस्तानचा हल्लाही सीमेच्या बाजूनेच होईल. त्यामुळे आम्ही हवाई सुरक्षेची पूर्ण तयारी आधीच केली होती असे ते म्हणाले. पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानच्या हवाई दलाने आपल्या तळांवर हवाई हल्ले केले ते सगळे आपल्या यंत्रणेसमोर निष्प्रभ ठरले असे घई म्हणाले.