‘देशातील लोकशाही व संविधान यांचे संरक्षण करण्यासाठी समाजवादी विचारसरणीच्या आधारेच जनतेसमोर जावे लागेल. याबरोबरच वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दलित व अल्पसंख्याकांवरील अत्याचार, शेतकऱयांचा आक्रोश अशा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित कार्यक्रम याआधारेच ‘इंडिया’ आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तापालट करू शकेल,’ असा सूर समाजवादी विचारवंत व कार्यकर्ते यांच्या परिषदेत व्यक्त करण्यात आला. पुणे येथील साने गुरुजी स्मारक भवन येथे राज्यस्तरीय व्यापक परिषद झाली.
समाजवादी विचारवंत व माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष सुभाष वारे, विद्यमान अध्यक्ष सुभाष लोमटे, अॅड. राम शरमाळे यांनी मार्गदर्शन केले.
‘देशाला पुरोगामी विचार महाराष्ट्राने दिला असून, समाजवादाची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रुजलेली आहेत. समाजवादाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला, तर महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे स्पष्ट मत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी या परिषदेमध्ये व्यक्त केले.
समाजवादी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये सक्रिय राहून लोकशाहीचा खून करणाऱया भाजप सरकारला सत्तेबाहेर काढण्यासाठी जीवाचे रान करणे ही काळाची गरज असल्याचे प्रा. सुभाष वारे यांनी सांगितले. ड़ॉ पी. डी. पाटोदेकर यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले. अॅड. रेवण भोसले यांनी आभार मानले. या कार्यक्रमामध्ये प्रताप होगाडे, प्रा. शरद जावडेकर, विठ्ठल सातव, शिवाजीराव परुळेकर यांनी चर्चेत भाग घेतला.