
बांगलादेशमध्ये ‘जेन-झी’ने आंदोलन करत माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावले होते. तेव्हापासून गेले 18 महिने हिंदुस्थान आणि बांगलादेशमधील संबंध ताणले गेले आहेत. ते सुधारण्यासाठी हिंदुस्थान आणि बांगलादेशने सहमती दर्शवली. त्याच वेळी शेख हसीना यांच्या मुद्दय़ामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होणार नाही, यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शविली.
हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलूर रहमान यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. त्या वेळी रहमान यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची पुन्हा एकदा मागणी केली. रहमान हे हिंदुस्थानच्या दौऱयावर आहेत. बांगलादेशमध्ये तारीक रहमान यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या सरकारच्या वरिष्ठ मंत्र्याचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे.
शेख हसीना यांच्या पक्षावरील बंदीला संसदेत मंजुरी
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर बंदी घालण्यात आली असून या बंदीला संसदेत मंजुरी देण्यात आली आहे. संसदेत एक विधेयक मंजूर करून हा निर्णय सरकारने घेतला आहे. गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी यासंबंधीचे विधेयक संसदेत सादर केले. या कायद्यांतर्गत पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे निलंबित असेल.























































