
तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशा बरोबरीनंतर हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया मालिका विजयाची गुढी उभारण्यासाठी सज्ज झाले आहेत. हिंदुस्थानला कसोटीपाठोपाठ वनडेतही मालिका विजय मिळवण्याचे ध्येय हिंदुस्थानसमोर आहे तर पाहुणा ऑस्ट्रेलिया आपल्या दौऱयाचा शेवट वन डे मालिका विजयाने करण्यासाठी सज्ज झालाय. दोन्ही संघ शेरास सव्वाशेर असल्यामुळे चेन्नईत थरारक क्लायमॅक्स पाहायला मिळणार हे निश्चित.
कसोटीत मालिकेतील पहिले तीन सामने तिसऱया दिवशीच संपले होते. अपवाद केवळ चौथ्या कसोटीचा जो पाचही दिवस खेळला गेला आणि अनिर्णितावस्थेतही सुटला. वन डेतही दोन्ही सामने कमी धावसंख्येचे झाले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांतच आटोपला तर दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाने सव्याज वचपा काढताना हिंदुस्थानचा डाव 117 धावांत गुंडाळला आणि विजयी लक्ष्य 11 षटकांतच बिनबाद गाठत हिंदुस्थानचा दहा विकेटने धुव्वा उडवला. त्यामुळे तिसरा सामना कसा होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूर्यकुमारसाठी धोक्याची घंटा
दोन चेंडूंत दोनवेळा शून्यावर बाद होणाऱया सूर्यकुमार यादवसाठी हा सामना धोक्याची घंटा ठरू शकते. सातत्यपूर्ण अपयशी ठरत असलेल्या सूर्यकुमारला आज यशस्वी खेळी करावीच लागेल. संघाच्या फलंदाजीला मजबुती देण्यासाठी लोकेश राहुल आणि सूर्यकुमारच्या फलंदाजीच्या क्रमात बदलाची शक्यता आहे. तसेच कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला खेळविण्याचा तयारी संघाने केलीय. तसेच गोलंदाजीत शार्दुल ठाकूरला बाहेरच बसावे लागणार आहे. उद्या खेळपट्टीचा रागरंग पाहिल्यानंतरच हिंदुस्थानच्या अंतिम अकरा खेळाडूंची नावे समोर येतील.
वॉर्नर खेळण्याची शक्यता
दिल्ली कसोटीत डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मायदेशी परतलेला डेव्हिड वॉर्नर पुन्हा हिंदुस्थानात आला असला तरी अद्याप त्याला एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही. मात्र उद्या अखेरच्या सामन्यात तो सलामीला दिसू शकतो. त्याच्या अनुपस्थितीत ट्रव्हिस हेड आणि मिचेल मार्शने दणदणीत सलामी दिली आहे. त्यामुळे जमलेल्या जोडीला पह्डून वॉर्नरला संघात घेताना संघ व्यवस्थापनाला चांगलाच विचार करावा लागणार आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्कच्या सोबतीला झम्पा असेलच. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दुसऱया सामन्यात जोरदार कामगिरी केल्यामुळे संघात फार बदल होण्याची कमीच शक्यता आहे.
हिंदुस्थानचा आणखी एक मालिका विजय की…?
हिंदुस्थानने गेल्या चार वर्षांत मायदेशात सलग नऊ मालिका जिंकल्या आहेत. हिंदुस्थानला 2019 साली ऑस्ट्रेलियाने 2-0 अशा पिछाडीनंतर 2-3 ने नमवले होते. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियानेच हिंदुस्थानच्या सलग मालिका विजयांचा रथ रोखला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहेत.
संभाव्य संघ
हिंदुस्थान – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, हार्दिक पंडय़ा,रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, सिराज
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, ट्रव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, मिचेल मार्श, अॅलेक्स पॅरी, पॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, स्टॉयनीस, अॅश्टन अॅगर, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा.