ICC T20 World Cup – अपराजित हिंदुस्थान! नेदरलँडचा पराभव करत टीम इंडियाने केली सलग चौथ्या विजयाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग दुसरे जगज्जेतेपद पटकावण्याचे ध्येय उराशी बाळगत मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानने टी-20 वर्ल्ड कपच्या साखळीत सलग चार विजयांची नोंद करत अपराजित सुपर एट एण्ट्री केली. अखेरचा साखळी सामना खेळत असलेल्या हिंदुस्थानने आपले विजयी सातत्य कायम राखताना नेदरलॅण्ड्सचा 17 धावांनी पराभव करत विजयी चौकार ठोकला. शिवम दुबेची 66 धावांची रॉकेट खेळी हिंदुस्थानसाठी संकटमोचक खेळी ठरली. तोच सामनावीर ठरला.

आजही हिंदुस्थानला नेदरलॅण्ड्ससारख्या संघाविरुद्ध विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत गोलंदाजी करावी लागली आणि विशेष म्हणजे अमेरिकेप्रमाणे नेदरलॅण्ड्सचा संघानेही 20 षटके फलंदाजी केली. हिंदुस्थानच्या एकापेक्षा एक गोलंदाजांनाही डच खेळाडूंचा पूर्ण संघ गारद करता आला नाही. 194 धावांचा पाठलाग करणारा नेदरलॅण्ड्स 5 षटकांचा खेळ शिल्लक असताना हिंदुस्थानच्या बरोबरीत होता. हिंदुस्थानी गोलंदाजांशी संघर्ष करणाऱया नेदरलॅण्डसने 15 षटकांत 5 बाद 118 धावा केल्या होत्या. हिंदुस्थानच्या फलकावरही 15 षटकांत तितक्याच धावा लागल्या होत्या. पण पुढील 5 षटकांत शिवम दुबे आणि हार्दिक पंडय़ाने 75 धावा चोपून काढल्या होत्या. मात्र डच फलंदाजांना 58 धावाच फटकावता आल्या. तरीही त्यांनी हिंदुस्थानी संघाचे ठोके चांगलेच वाढवले होते. नेदरलॅण्ड्सच्या सहा फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्यामुळे त्यांनी हिंदुस्थानी आव्हानाचा पाठलाग केला.

दुबे-पंडय़ाने लाज राखली

अभिषेक शर्मा सलग तिसऱयांदा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर इशान किशनही 18 धावांवर बाद झाला. मग तिलक वर्मा (31) आणि सूर्यकुमार यादवने (34) डाव सावरला, पण ते धावांचा वेग वाढवू शकले नाहीत. 13 व्या षटकांत शंभरी गाठणाऱया हिंदुस्थानने 15 षटकांत केवळ 118 धावा केल्यामुळे 170 धावाही कठीण वाटत होत्या, पण तेव्हा शिवम दुबे – हार्दिक पंडय़ाने 8 षटकार आणि 3 चौकार खेचत 75 धावांचा पाऊस पाडला.