फेक व्हिडीओ आणि माहितीचा प्रसार, Operation Sindoor नंतर हिंदुस्थानने सायबर सुरक्षा वाढवली

हिंदुस्थानी सैन्याने लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर सोशल मीडियावर अनेक फेक व्हिडीओ आणि दिशाभूल करणारी माहिती व्हायरल होत आहे. यामध्ये हिंदुस्थानी सैन्याचे कारवाईचे खोटे व्हिडीओ, फेक फोटो आणि खोट्या मृत्यूंच्या आकडेवारीचा समावेश आहे. यातच आता सोशल मीडियावर फेक व्हिडीओ, खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीचा प्रसार वाढल्याने केंद्र सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. या सायबर हल्ल्यांमागे परदेशी शक्ती आणि दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यातच आता ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थानने आपली सायबर सुरक्षा वाढवली आहे.

केंद्र सरकारने सायबर धोक्यांना तोंड देण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. केंद्रीय यंत्रणांनी दिशाभूल करणारी, चुकीची माहिती पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट आणि वेबसाइट्सवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स एक्स, फेसबुक आणि यूट्यूब यांना खोट्या माहितीचा प्रसार करणारे कंटेंट हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या युजर्सला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. अचूक माहितीसाठी अधिकृत स्रोतांची तपासणी करा आणि आणि खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागल्याने हिंदुस्थानच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची जबाबदारी असलेल्या एजन्सी आणि संघटना, जसे की ऊर्जा मंत्रालय, बँकांसह वित्तीय संस्था आणि दूरसंचार ऑपरेटर देखील हाय अलर्टवर आहेत.