अफगाणी नागरिकांवर होणारे हल्ले म्हणजे युद्धच! संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदुस्थानकडून पाकिस्तानची पोलखोल

हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावपूर्ण शांतता होती. मात्र, आता दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर लढत आहेत. हिंदुस्थानने गुरुवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अधिवेशनात पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यांमध्ये महिला, मुले आणि स्थानिक क्रिकेट खेळाडूही मारले गेले आहेत. हिंदुस्थानने या घटनांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानचे असे हल्ले म्हणजे युद्धच असल्याचे हिंदुस्थानने सुनावले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात चकमकी झाल्या. दोन महिन्यांपूर्वी दोन्ही देशांनी सीमेवर सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती. पण आता, दोन्ही बाजू पुन्हा एकदा एकमेकांवर हल्ले करत आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर युद्धबंदीचा भंग केल्याचा आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्रांमधील हिंदुस्थानचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी सांगितले की, हिंदुस्थान पाकिस्तानच्या व्यापार आणि वाहतूक दहशतवाद धोरणांबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतो. पाकिस्तान वारंवार अफगाणिस्तानची सीमा बंद करतो. त्यामुळे अफगाणिस्तानचे मोठे नुकसान होते.

संयुक्त राष्ट्रांमधील हिंदुस्थानचे स्थायी प्रतिनिधी हरीश म्हणाले की, आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा, विशेषतः निष्पाप नागरिकांच्या संरक्षणाचा पूर्ण आदर करण्याच्या आवाहनाचे समर्थन करतो. ज्या भूपरिवेष्ठित देशाचे लोक वर्षानुवर्षे गंभीर आव्हानांना तोंड देत आहेत, त्यांचा रस्ता बळजबरीने बंद करणे हे डब्ल्यूटीओ मानकांचे उल्लंघन आहे. एका देशाविरुद्ध अशा उघड धमक्या आणि युद्धाच्या कृती संयुक्त राष्ट्रांच्या सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहेत.आम्ही अशा कृत्यांचा निषेध करतो आणि अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे, सार्वभौमत्वाचे आणि स्वातंत्र्याचे ठामपणे समर्थन करतो, असे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे.