
कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवाचे उट्टे काढत यजमान ‘टीम इंडिया’ने दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत 2-1 फरकाने धूळ चारली. तिसऱ्या व निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्स आणि 61 चेंडू राखून धुव्वा उडविला. यशस्वी जैस्वालचा एकदिवसीय शतकाचा श्रीगणेशा, रोहित शर्मा व विराट कोहली यांची दमदार अर्धशतके आणि त्याआधी प्रसिध कृष्णा व कुलदीप यादव यांनी टिपलेले चार-चार बळी हे हिंदुस्थानच्या विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली. शतकवीर यशस्वी जैस्वाल हा ‘सामनावीर’ ठरला, तर ‘मालिकावीर’चा बहुमान अर्थातच विराट कोहलीला मिळाला.
दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेले 271 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 39.1 षटकांत केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात पूर्ण केले. यशस्वी जैस्वाल (नाबाद 116) व रोहित शर्मा (75) यांनी 25.5 षटकांत 155 धावांची खणखणीत सलामी दिली. रोहितने 73 चेंडूंत सात चौकारांसह तीन षटकार ठोकले.
यशस्वी जैस्वालने आपल्या वन डे कारकीर्दीतील पहिले शतक झळकाविले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे नववे शतक ठरले. याचबरोबर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकाविणारा जैस्वाल सहावा हिंदुस्थानी ठरला.
कृष्णा, कुलदीपचा अचूक मारा
बावुमा बाद झाल्यानंतर प्रसिध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी अचूक गोलंदाजी करीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची दाणादाण उडविली. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटॉन डिकॉक व कर्णधार टेम्बा बावुमा (48) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी करीत दक्षिण आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. डिकॉकने 89 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 106 धावा केल्या. बावुमाने अर्धशतक झळकाविले. त्याने 67 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या.


























































