Operation Sindoor : हिंदुस्थानने केला ‘राईट टू रिस्पॉन्स’चा वापर, फक्त त्यांनाच मारलं ज्यांनी आमच्या नागरिकांना मारलं – राजनाथ सिंह

आम्ही फक्त त्यांनाच मारलं ज्यांनी आमच्या नागरिकांना मारलं. हिंदुस्थानने आपल्या भूमीवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राईट टू रिस्पॉन्सचा वापर केला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. यातच आज दिल्लीत 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 50 बीआरओ पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “काल रात्री आपल्या हिंदुस्थानी सैन्याने त्यांचे अद्भुत शौर्य दाखवून एक नवा इतिहास रचला. हिंदुस्थानी सैन्याने सावधगिरीने आणि संवेदनशीलतेने कारवाई केली आहे. लक्ष्य निश्चित करण्यात आले होते, जे निर्धारित वेळेत उद्ध्वस्त करण्यात आले. कोणत्याही नागरी स्थानावर परिणाम होणार नाही, याची खात्री करून सैन्याने संवेदनशीलता दाखवत कारवाई केली.”

ते म्हणाले की, “आम्ही हनुमानजींच्या त्या आदर्शाचे पालन केले आहे, जे त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना केले होते. जिन्ह मोहे मारा, तिन्हे मोई मारे. आम्ही फक्त त्यांनाच मारलं, ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारलं.”