
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून हिंदुस्थानी जहाजांचा मार्ग मोकळा करण्यासाठी हिंदुस्थान सरकारने मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याबाबत हिंदुस्थान सध्या इराणशी सातत्याने चर्चा करत आहे. यामुळे कच्च्या तेलाचा आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. इराणसोबत जहाजांच्या वाहतुकीबाबत अद्याप कोणताही लेखी किंवा पक्का करार झाला नसला तरी, प्रत्येक जहाजाच्या हालचालींचे सध्या वैयक्तिकरित्या व्यवस्थापन केले जात आहे.
इराणने सर्व हिंदुस्थानी ध्वज असलेल्या जहाजांना सरसकट परवानगी देण्यावर अद्याप सहमती दर्शवलेली नाही, मात्र दोन्ही देशांमधील संवाद सकारात्मक दिशेने सुरू आहे. ‘फायनान्शियल टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी स्पष्ट केले की, शांत बसण्यापेक्षा समन्वय साधून तोडगा काढणे हिंदुस्थानच्या हिताचे आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील 20 टक्के कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचा मुख्य मार्ग आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे हा मार्ग बंद झाल्याने हिंदुस्थानसह अनेक देशांसमोर इंधन आणि एलपीजी संकटाचे सावट निर्माण झाले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या खार्ग बेटावर संभाव्य हल्ल्याचे संकेत दिल्यानंतर आणि मित्र राष्ट्रांना नौदल तैनात करण्याचे आवाहन केल्यानंतर या भागातील तणाव अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. युरोपीय देशही अशाच प्रकारचा करार करू शकतात का, या प्रश्नावर जयशंकर यांनी सांगितले की, प्रत्येक देशाचे इराणशी असलेले संबंध वेगळे आहेत, त्यामुळे थेट तुलना करणे कठीण आहे. तरीही हिंदुस्थान आपली रणनीती युरोपीय देशांसोबत सामायिक करण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले. फ्रान्स आणि इटली यांसारखे देशही ऊर्जा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तेहरानशी संवाद साधत आहेत.
दरम्यान, हिंदुस्थानचे हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेल्या 22 हिंदुस्थानी जहाजांपैकी दोन जहाजे सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ ही दोन हिंदुस्थानी एलपीजी वाहक जहाजे सुमारे 92,712 मेट्रिक टन गॅस घेऊन हिंदुस्थानकडे रवाना झाली आहेत. शिवालिक 16 मार्च रोजी मुंद्रा बंदरात, तर नंदा देवी 17 मार्च रोजी कांडला बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. इराणसोबतचा हा संवाद केवळ व्यवहारापुरता मर्यादित नसून, हिंदुस्थान आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा हा भाग असल्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी अधोरेखित केले आहे.
























































