
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, भोपाळ, जम्मूसह देशभरात विविध शहरांमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशच्या उच्चायुक्त कार्यालयांवर मोर्चे काढले. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी काही ठिकाणी सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
मुंबईत बांगलादेशच्या उप उच्चायुक्त कार्यालयावर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. कोलकाता येथे बेकबागान भागात बांगलादेशच्या उप उच्चायुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी हिंदू हुंकार पदयात्रा काढली. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून उच्चायुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. 12 जणांना यावेळी अटक करण्यात आली आहे. भोपाळ, जम्मू इत्यादी शहरांमध्येही हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले.
मुंबईतही निदर्शने
बांगलादेशात चार दिवसांपूर्वी उसळलेल्या दंगलीत एका हिंदू युवकाला जबर मारहाण करून जाळण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेने मुंबईतील कफपरेड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागात जोरदार आंदोलन, रास्ता रोको केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.
दोन्ही देशांकडून उच्चायुक्तांना समन्स
हिंदुस्थान आणि बांगलादेशमधील संबंध ताणले गेले आहेत. हिंदुस्थानने पुन्हा एकदा बांगलादेशचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्ला यांना परराष्ट्र मंत्रालयाने समन्स बजावून बोलावण्यात आले होते. त्यापूर्वी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील हिंदुस्थानी उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना बोलावले होते. गेल्या दहा दिवसांमध्ये हे दुसऱयांदा घडले आहे. तणाव वाढल्यानंतर आधी हिंदुस्थानने आणि त्यानंतर बांगलादेशने व्हिसा देणे थांबवले आहे.




















































