Operation Sindoor – दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी अधिकार वापरला, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती

पाकिस्तानातील दहशतवादी पहलगामप्रमाणे आणखी हल्ले करणार असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. आम्ही हे हल्ले रोखण्याचा अधिकार वापरला, ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम आखली, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.

पहलगाम हल्ल्यानंतर हल्लेखोर आणि पाकिस्तानातील त्यांचे म्होरके यांच्यातील मोबाईल संभाषण, द रेझिस्टंट फ्रंटसारख्या गटांच्या सोशल मीडिया पोस्ट यातून अधिक माहिती मिळत गेल्याचे विक्रम मिस्री यांनी सांगितले. यात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीचाही उपयोग झाल्याचे ते म्हणाले. हिंदुस्थानने केलेला एअर स्टाईक दहशतवादविरोधातील जागतिक लढय़ाचाच भाग म्हणून पाहिला जायला हवा, असेही ते म्हणाले. त्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत जारी करण्यात आलेल्या निवेदनाचा त्यांनी या वेळी दाखला दिला. दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱयांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हिंदुस्थानने त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्याचे मिस्री यांनी सांगितले.

दहा वर्षांत 350हून अधिक हिंदुस्थानींचा बळी

गेल्या दहा वर्षांत 350हून अधिक हिंदुस्थानी सीमेपलीकडील दहशतवादाचा बळी ठरल्याचे मिस्री म्हणाले. 500हून अधिक जवान दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले, तर 1 हजार 400हून अधिक जवान जखमी झाल्याचे मिस्री यांनी सांगितले.

दहशतवाद्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर संपवण्यासाठी कारवाई

संयुक्त राष्ट्रांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला होता. तसेच पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे, हल्लेखोर दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. दहशतवादी आणखी हल्ले करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवादी तळ शोधून ते उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्यांचे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर संपवण्यासाठी कारवाई केली. योजना आखली आणि अचूक लक्ष्यभेद केल्याचे मिस्री म्हणाले.