
‘आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) मुळे अनेक देशांत भीतीचे वातावरण आहे, मात्र हिंदुस्थान एआयकडे भाग्य आणि भविष्याचे प्रतीक म्हणून पाहतो आहे. हिंदुस्थान त्यास विकास यात्रेतील टार्ंनग पॉइंट समजतो,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एआय इम्पॅक्ट समिटमध्ये केले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी एआयच्या सुरक्षित वापरासाठी नवे सूत्र दिले. नैतिकता (मोरल M), उत्तरदायित्व (अकाउंटॅबिलिटी A), राष्ट्रीय सार्वभौमत्व (नॅशनल सोव्हरीनिटी N), सुलभता (अॅक्सेसिबल A) आणि वैध (व्हॅलिड V) अर्थात ‘मानव’ या चौकटीत एआयचा वापर झाला पाहिजे. जेणेकरून तो केवळ डेटा पॉइंट न बनता मानवतेच्या कल्याणाचे माध्यम बनेल,’ असे मोदी म्हणाले.
एआयमध्ये 10 लाख कोटी गुंतवणार – मुकेश अंबानी
मुकेश अंबानी यांनी एआय तंत्रज्ञान सर्वसामान्य हिंदुस्थानींपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार बोलून दाखवला. ‘ज्याप्रमाणे जियोने डेटा स्वस्त केला, त्याचप्रमाणे एआय तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी रिलायन्स आणि जिओ पुढच्या सात वर्षांत 10 लाख कोटींची गुंतवणूक करेल,’ असे अंबानी म्हणाले.
डिजिटल कंटेंटवर लेबलिंग हवे!
खाद्यपदार्थांवर ज्याप्रमाणे न्यूट्रिशन लेबल असते, त्याचप्रमाणे डिजिटल कंटेंटवर सत्यतेचा शिक्का असायला हवा. जेणेकरून कोणता कंटेट खरा आणि कोणता एआय निर्मित आहे हे लोकांना कळेल, असे मोदी यांनी सांगितले.
नेक्स्ट जनरेशन डेटा सेंटर बनवणार – टाटा ग्रुप
पुढील पिढीला एआय प्रशिक्षण देण्यासाठी टाटा समूह नेक्स्ट जनरेशन डेटा सेंटर बनवत आहे. त्यासाठी आम्ही ओपनआय सोबत भागीदारी केली आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली. सीईओंच्या दुराव्याची चर्चा
समिटच्या औपचारिक उद्घाटनानंतर ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन, अँथ्रोपिकचे सीईओ दारियो अमोदेई, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मेटाचे प्रमुख एआय अधिकारी अलेक्झांडर वँग, गुगल डीपमाइंडचे सीईओ डेमीस हसाबीस हे सगळे ग्रुप पह्टोसाठी स्टेजवर आले. एकत्र आल्यावर सर्वांनी हातात हात घेत कॅमेऱ्यासमोर उंचावले. मात्र, त्यावेळी एकमेकांच्या शेजारी उभे असलेले अल्टमन आणि अमोदेई यांनी हातात हात घेतले नाहीत. हा पह्टो व्हायरल झाला आणि अल्टमन व दारियो यांच्यातील मतभेदाची चर्चा रंगली होती.


























































