
अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या इराणच्या मदतीसाठी हिंदुस्थान धावून आला आहे. हिंदुस्थनांने इराणला औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप पाठवली असून, ही मदत इराणी रेड क्रिसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या मदतीबद्दल इराणने हिंदुस्थानी नागरिकांचे जाहीर आभार मानले आहेत.
इराणमधील हिंदुस्थानी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय मदतीचा हा पहिला साठा यशस्वीरीत्या इराणमध्ये पोहोचला आहे. हिंदुस्थानने दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल इराणने म्हटले आहे की, “हिंदुस्थानातील आदरणीय आणि दयाळू लोकांचे आम्ही मनापासून आभार मानतो.”
हिंदुस्थानातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी दिल्ली-तेहरान संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी हिंदुस्थानला एक मित्र देश म्हणून संबोधले असून दोन्ही देशांचे हितसंबंध सारखे असल्याचे म्हटले आहे. फतहली म्हणाले आहेत की, यापूर्वीही जहाजांच्या बाबतीत हिंदुस्थानने इराणला मोठी मदत केली होती. अनेक देशांनी सहकार्य करण्यास नकार दिला असताना हिंदुस्थानने इराणची विनंती मान्य केली, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, इराणमधील परिस्थिती पाहून अनेक हिंदुस्थानी नागरिकांनीही वैयक्तिकरीत्या मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासाठी दूतावासाने एक बँक खातेही जारी केले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे सध्या ऑनलाइन ट्रान्सफरमध्ये अडचणी येत आहेत. दूतावासाने लोकांना GPay सारख्या माध्यमांतून पैसे न पाठवण्याचे आवाहन केले असून, जे नागरिक मदत करू इच्छितात ते थेट दूतावासात जाऊन रोख स्वरूपात मदत जमा करू शकतात, असे सांगण्यात आले आहे.


























































