
जॅमी स्मिथ (ना. 184) आणि हॅरी ब्रूकने (158) वैयक्तिक दीडशतकांसह सहाव्या विकेटसाठी केलेल्या 303 धावांच्या वादळी भागीच्या जोरावर इंग्लंडने फॉलोऑन टाळत सामन्यावर पकड निर्माण केली होती. मात्र 5 बाद 387 अशा भक्कम स्थितीत असलेल्या इंग्लंडला सिराज भूकंपाचा तडाखा बसला आणि त्यांचा अर्धा संघ 20 धावांत बाद झाल्यामुळे हिंदुस्थानला 180 धावांची जबरदस्त आघाडी मिळाली.
हिंदुस्थानने तिसऱ्या दिवसअखेर 1 बाद 64 अशी मजल मारत आपली आघाडी 244 धावांपर्यंत वाढवली. आता हिंदुस्थानला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इंग्लंडपुढे किमान 500 धावांचे आव्हान उभारणे गरजेचे असेल. आज सकाळी सिराजने सलग दोन धक्के देत इंग्लंडची 5 बाद 84 अशी अवस्था झाल्याने हिंदुस्थानच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते; पण जॅमी स्मिथच्या हिंदुस्थानी गोलंदाजीचा चुराडा करणाऱ्या खेळीने त्यांचे हास्यच पळवले.
स्मिथचा घणाघात पाहून पेटून उठलेल्या हॅरी ब्रूकनेही लोहा गरम है, मार दो हतोडा शैलीत फटकेबाजी करत सहाव्या विकेटसाठी त्रिशतकी भागी रचली आणि हिंदुस्थानी फलंदाजांनी केलेली वर्चस्वाची सारी हवाच काढून टाकली होती. मात्र चहापानानंतर नवा चेंडू घेताच सामन्याने कूस बदलली. आकाश दीपने ब्रूकची विकेट काढत त्रिशतकी भागी फोडली. त्यानंतर सिराजने तळाच्या तिन्ही फलंदाजांना शून्यावर बाद करत इंग्लंडचा डाव अनपेक्षितपणे 407 धावांवर संपवला. सिराजने कारकीर्दीत प्रथम इंग्लंडमध्ये 6 विकेट टिपले.
स्मिथ-ब्रूकचा त्रिशतकी झंझावात
दिवसाच्या दुसऱ्याच षटकांत सलग चेंडूंवर दोन विकेट टिपत हिंदुस्थानने सामन्यावर पकड घेतली होती, पण जॅमी स्मिथने बॅझबॉल शैलीत फटकेबाजी करत कसोटीचा सारा माहौलच बदलून टाकला. त्याने हिंदुस्थानच्या सर्वच गोलंदाजांवर प्रहार करत 80 चेंडूंतच अवघ्या एका सत्रातच आपले दुसरे शतक साजरे केले. यात त्याच्या 14 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. ब्रूकनेही फटकेबाजी केल्यामुळे इंग्लंडने पहिल्या सत्रातील 27 षटकांत 172 धावा चोपून काढल्या.