हिंदुस्थानात तयार होणार 96 राफेल फायटर जेटस्! फ्रान्सचा सोर्स कोड शेअर करण्यास नकार, 114 पैकी 18 जेटस् हे फ्रान्समधून येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान फ्रान्सकडून 114 नवीन राफेल फायटर जेट खरेदी करत आहे. 114 पैकी 18 जेटस् हे फ्रान्समधून फ्लाय अवे या स्थितीत मिळतील. तर उर्वरित 96 जेट्स हिंदुस्थानात तयार केले जातील. यासाठी 25 टक्के सुटे भाग हे स्वदेशी असतील, अशी माहिती समोर आली आहे. परंतु फ्रान्सने सोर्स कोड देण्यास नकार दर्शवला आहे. कोणताही देश आपल्या फायटर जेटचा सोर्स कोड शेअर करत नाही. हाच कोड रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, टार्गेट ट्रकिंग आणि शस्त्र प्रणाली नियंत्रित करतो, त्यामुळे तो शेअर केला जात नाही. मात्र, करारावर याचा परिणाम होणार नाही.

फ्रान्ससोबतच्या करारात इंटरफेस कंट्रोल डॉक्युमेंट समाविष्ट करण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून स्वदेशी प्रणाली जेट्समध्ये जोडता येतील. आयसीटी हे एक दस्तऐवज आहे, जे फायटर जेट आणि त्याच्या विविध प्रणालींमधील समन्वय निश्चित करते. यामुळे हिंदुस्थान आपल्या स्वदेशी शस्त्र प्रणालींना राफेलमध्ये समावेश करू शकेल. संरक्षण मंत्रालय पुढील महिन्यात डसॉल्ट एव्हिएशनला रिक्वेस्ट फॉर प्रपोजल जारी करेल. यानंतर करारावर चर्चा सुरू होईल. रशियानेही एसयू-57 आणि एसयू-30 एमकेआयचे सोर्स कोड शेअर केलेले नाहीत. अमेरिकन कंपन्याही आपल्या लष्करी विमानांचे सॉफ्टवेअर कोड कोणत्याही देशाला देत नाहीत.

ताफ्यातील विमानांची संख्या 176 वर

114 राफेल करार पूर्ण झाल्यानंतर हिंदुस्थानच्या ताफ्यातील राफेल विमानाची संख्या 176 पर्यंत पोहोचेल. फ्रान्सकडून वायुदलासाठी 36 राफेल जेट्सदेखील खरेदी केली आहेत. हा करार 58,000 कोटी रुपयांमध्ये झाला होता. राफेल मरीन विमानाची वैशिष्ट्ये वायुदलाच्या राफेल विमानांपेक्षा प्रगत आहेत.