
T-20 World Cup 2026 चा रंग चांगला चढला आहे. क्रिकेटप्रेमींचं लक्षं आता हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीकडे लागलं आहे. हिंदुस्थानातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या वानखेड स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ओळखीचे मैदान, खेळपट्टी, उत्साह वाढवणारा हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी असं जरी असलं तरी ‘दव’ हिंदुस्थानी संघासाठी थोडी अडचण निर्माण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ मधील बहुप्रतिक्षित थरार आता जवळ आला आहे. हिंदुस्थान आणि इंग्लंड हे दोन दिग्गज संघ गुरुवारी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे हिंदुस्थानी संघाचे मनोबल उंचावलेले आहे, तर सुरुवातीच्या काही अडथळ्यांनंतर इंग्लंडचा संघही आता फॉर्मात परतला आहे. परंपरेनुसार वानखेडेची खेळपट्टी गोलंदाजांपेक्षा फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर मानली जाते, मात्र तरीही काही आव्हाने कायम आहेत.
वानखेडे स्टेडियम खेळपट्टी अहवाल (Pitch Report)
उपांत्य फेरीच्या पार्श्वभूमीवर वानखेडेच्या खेळपट्टीवर हिरवळीचा थर (Green Tinge) कायम ठेवण्यात आला आहे. खेळपट्टीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. ही लाल मातीची (Red Soil) खेळपट्टी असल्याने, त्यावर असलेले गवत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे पृष्ठभाग लवकर कोरडा होत नाही.
सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना गवतामुळे आणि लाल मातीच्या नैसर्गिक गुणामुळे ‘सीम मूव्हमेंट’ आणि जादा बाउन्स मिळण्याची शक्यता आहे. पॉवरप्लेमध्ये सलामीच्या फलंदाजांना चेंडूच्या हालचालीमुळे अडचणी येऊ शकतात. जसजसा सामना मध्यंतराकडे सरकेल, तशी खेळपट्टी स्थिरावू लागेल. गवत कमी झाले किंवा खेळपट्टी थोडी खडबडीत झाली, तर फिरकीपटूंना चेंडू वळवण्यासाठी मदत मिळू शकते.
एकंदरीत, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असून २०० हून अधिक धावांची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात ‘दव’ (Dew Factor) मोठी भूमिका बजावू शकतो.
wankhede pitch report: india vs england t20 world cup semi-final updates
check the wankhede stadium pitch report for india vs england t20 world cup 2026 semifinal. bowling coach morne morkel highlights dew concern and bounce.
मॉर्ने मॉर्कलने व्यक्त केली ‘दव’ फॅक्टरची भीती
हिंदुस्थानी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी दवाच्या संभाव्य परिणामाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘दव ही नेहमीच मोठी चिंता असते. पण नाणेफेक ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या हातात नसते. वानखेडेवर नेहमीच थोडी जास्तच बाउन्स मिळतो’.
‘फलंदाज इथल्या बाउन्सवर विश्वास ठेवून फटकेबाजी करू शकतात, पण एक गोलंदाज म्हणून हीच उसळी तुम्हाला विकेट मिळवून देण्याची संधीही देते. इथे चुकांना खूप कमी वाव आहे. मैदान लहान असल्याने चेंडू वेगाने सीमापार जातो’, असे मॉर्कल यांनी स्पष्ट केले.
आक्रमक राहणे चांगले!
ते पुढे म्हणाले की, ‘प्रत्येक षटकात लढावे लागेल, प्रत्येक चेंडूवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण फलंदाजाची ताकद हीच या खेळपट्टीवर त्याची कमजोरी ठरू शकते. कधीकधी जास्त बचावात्मक न होता आक्रमक राहणे चांगले असते, कारण त्यातूनच संधी निर्माण होतात.’
हिंदुस्थानात क्रिकेट जणू एक धर्म आहे, उपासना आहे. इथल्या लोकांच्या शरिरात रक्तासोबत क्रिकेट सळसळतं असं म्हटलं तरी अतिश्योक्ति ठरणार नाही अशी परिस्थिती आहे. क्रिकेट म्हटलं की हातातली कामं बाजूला ठेऊन लोक त्याचा आनंद घेतात. त्यामुळे आता हिंदुस्थानच्या विजयासाठी प्रार्थना सुरू झाल्या आहेत. सगळ्यांचं लक्ष्य या सामन्याकडे लागलं आहे.


























































