
यूएईचा पाचव्या षटकातच पराभव आणि त्यानंतर पाकिस्तानचा 16 व्या षटकातच फडशा पाडल्यानंतर आता हिंदुस्थानचा संघ महाविजयाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या इतिहासात हिंदुस्थान ओमानविरुद्ध प्रथमच टी-20 च नव्हे तर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. त्यामुळे या दुबळय़ा संघाविरुद्ध हिंदुस्थानी फलंदाज किती निर्दयीपणे वागतात ते कळेलच.
मध्ये पोहोचलेल्या हिंदुस्थानला साखळीतील तिन्ही लढती जिंकायच्या आहेत. या स्पर्धेत आठ संघ खेळले, पण एकही संघ अपराजित राहिलेला नाही. अपवाद फक्त एकटय़ा हिंदुस्थानचा. या सामन्यात हिंदुस्थानी संघावर आणि संघ व्यवस्थापनावर कोणताही दबाव नाही. त्यामुळे गेल्या दोन्ही लढतींत ज्यांना संधी लाभली आहे ती उर्वरित सर्वांना खेळविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओमान संघ या स्पर्धेतून आपोआप बाहेर फेकला गेला असल्यामुळे बलाढय़ हिंदुस्थानविरुद्ध त्यांना आपल्या क्षमतेनुसार खेळ दाखवण्याची संधी असेल. पण ओमान या संधीचे किती सोनं करणार ते उद्या कळेलच.
जतिंदर सिंगच्या नेतृत्वाखालील ओमान आपला शेवट समाधानकारक करण्यासाठी उत्सुक आहे. पण क्रिकेटच्या बालवाडीत असल्यामुळे त्यांच्याकडून मोठय़ा चमत्काराची किंचितही अपेक्षा नाही. ओमानविरुद्ध हिंदुस्थान संघात काही बदल करणार असला तरी खूप बदल असण्याची शक्यता कमीच आहे. जसप्रीत बुमराला सुपर पह्रमध्ये पूर्ण ताकदीनिशी खेळता यावे म्हणून विश्रांती देणार आहे. त्याच्या जागी हर्षित राणा किंवा अर्शदीपला खेळविण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या दोन सामन्यांत 7 विकेट टिपणाऱया कुलदीपलाही विश्रांती दिली जाणार आहे. वरुण चक्रवर्तीलाही संघात स्थान मिळू शकते. संघात एक-दोन बदलच अपेक्षित आहेत. उर्वरित संघ तोच असेल.
येत्या आठवडय़ात हिंदुस्थानला सुपर पह्रचे तीन सामने खेळावे लागणार आहे आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना 21 सप्टेंबरला खेळावा लागणार आहे. तसेच सुपर पह्रमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश या संघाशी भिडावे लागणार आहे. संभाव्य विजेत्यांच्या यादीत हिंदुस्थानपाठोपाठ अफगाणिस्तानचेही नाव घेतले जात होते, मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना कुसल मेंडिसच्या झंझावातापुढे झुकावे लागले. परिणामतः अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद झाला आणि बांगलादेशने सुपर फोर गाठले.