
टी-20 विश्वचषकाच्या रणसंग्रामाला काही तास शिल्लक असतानाच हिंदुस्थानच्या ‘यंगिस्तान’ने भविष्याची घंटा जोरात वाजवली. 19 वर्षांखालील अर्थातच युवा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवत हिंदुस्थानने सहाव्यांदा जगज्जेते पदावर आपले नाव कोरले. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे वादळ अंतिम सामन्यातही घोंगावले आणि त्याने इंग्लिश गोलंदाजांचा चेंदामेंदा करत हिंदुस्थानचे जगज्जेतेपद पहिल्या डावातच निश्चित केले. मग हिंदुस्थानी गोलंदाजांनी दुसऱया डावात त्याची औपचारिकता साकारली. विशेष म्हणजे अपराजित संघांमध्ये झालेल्या लढतीत हिंदुस्थानने इंग्लंडची धुळधाण उडवत अपराजित जगज्जेतेपद संपादण्याचाही पराक्रम केला.
इतिहास थरथरला, विक्रम कोसळले वैभव सूर्यवंशीचा हरारेत धावास्फोट
वयाने बालक, पण फटक्यांनी भूकंपासारखा हादरवणारा फलंदाज ठरला वैभव सूर्यवंशी. त्याने युवा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अशी धगधगती फलंदाजी केली की इंग्लंडचे गोलंदाज चेंडू नव्हे, तर स्वतःलाच शोधत फिरत होते. अवघ्या 14 वर्षांच्या या धडाकेबाजाने 175 धावांची तुफानी खेळी करत विक्रमांचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडवले आणि स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासात कोरले. त्याचा हा खेळ पाहून इतिहासही थरथरला. विक्रम पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले, पण महाविक्रम पुन्हा रचले गेले.
इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभवने 80 चेंडूंत 15 चौकार आणि 15 षटकार ठोकत इंग्लिश आक्रमणाचा पालापाचोळा केला. प्रत्येक फटका म्हणजे प्रेक्षकांसाठी जल्लोष आणि प्रतिस्पर्ध्यांसाठी धडकी भरवणारा इशारा होता. ही केवळ खेळी नव्हती, तर भविष्यातील वादळाचा महाप्रलयंकारी ट्रेलर होता. फिल्म तो अभी बाकी है मेरे दोस्त, असे प्रत्येकाच्या जिभेवर होते. या खेळीसह वैभव अंडर-19 विश्वचषकाच्या प्ले-ऑफ सामन्यात 150पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. याआधी हा विक्रम वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरनच्या नावावर होता (143 धावा, 2014). तो विक्रम वैभवने थेट उडवून लावला. इतक्यावरच न थांबता, अंतिम सामन्यातील सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडला. यापूर्वी हा मान उन्मुक्त चंदकडे (111 ना., 2012) होता. आता तो इतिहासजमा झाला. युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत वैभव दुसऱया क्रमांकावर पोहोचला असून अव्वल स्थान अजूनही अंबाती रायुडूकडे (177 धावा, 2002) आहे.
सर्वात तरुण शतकवीर ठरताना वैभवने आणखी एक विक्रम मोडला. याआधी हा मान पाकिस्तानच्या बाबर आझमकडे (15 वर्षे 92 दिवस) होता. वैभवने मात्र 14 वर्षे 316 दिवसांत ही किमया केली. एवढेच नव्हे, तर 71 चेंडूंत 150 धावा करत तो हा टप्पा सर्वात जलद गाठणारा खेळाडू ठरला आणि इंग्लंडच्या बेन मेयेसचा विक्रमही पुसून टाकला.
क्रिकेटचे विश्व गाजवणाऱया वैभव सूर्यवंशीने अपेक्षेप्रमाणे अंतिम सामनाही गाजवला. अवघ्या 80 चेंडूंत 15 चौकार आणि 15 षटकारांची आतषबाजी करत त्याने 175 धावांची त्सुनामीलाही लाजवेल, अशी खेळी केली. त्याच्यासमोर इंग्लिश गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. आजच्या विजयाचा तोच शिल्पकार ठरला. तोच सामनावीर तोच मालिकावीरही ठरला. त्याने आज आपल्या अद्भुत खेळीने हरारेच्या मैदानावर हिंदुस्थानच्या जगज्जेतेपदाचा वैभवशाली सोहळा पार पाडला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने इंग्लंडसमोर 412 धावांचे एव्हरेस्ट उभारले होते. कर्णधार आयुष म्हात्रे (53) याने वैभवला उत्तम साथ दिली. नंतर वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, विहान मल्होत्रा आणि कनिष्क चौहान यांनी धावसंख्या ‘चारशे’पार नेली. हिंदुस्थानचे चारशेपार आव्हान पाहूनच इंग्लिश फलंदाजांच्या नाडय़ा थंड पडल्या होत्या. त्यांनी आधीच हार मानली. हिंदुस्थानी गोलंदाजांच्या प्रभावी मार्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने त्यांना 50 षटकेही पूर्ण खेळता आली नाहीत. इंग्लंडचा डाव 40.2 षटकांमध्ये 311 धावांमध्येच आटोपला. इंग्लंडच्या फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलं नाही. मधल्या फळीतील फलंदाज केलेब फाल्कनर याने अखेरपर्यंत झुंज दिली. केलेबने 67 चेंडूंत 9 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 115 धावांची चिवट खेळी केली. मात्र तो संघाला विश्वचषक मिळवून देण्यात अपयशी ठरला. तर सलामीवीर बेन
डॉकिन्सने 66 धावांची, बेन मेसने 45 धावांची खेळी केली. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. टीम इंडियासाठी आरएस अंब्रिशने सर्वाधिक 3 बळी टिपले.
अंतिम सामन्यात इंग्लंडचा दुसऱ्यांदा पराभव
युवा वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱयांदा पाणी पाजले आहे. यापूर्वी हिंदुस्थानने 2022मध्ये या विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. चार वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत विजय मिळवला आहे. इंग्लंडचा डाव 40.2 षटकांतच 311 धावांवर गुंडाळला गेला. केलेब फाल्कनरची 115 धावांची झुंज अपुरी ठरली.


























































