Breaking – दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश, हिंदुस्थानचा दणदणीत विजय

678

हिंदुस्थानी संघाने अपेक्षेप्रमाणे रांची कसोटीमध्ये विजय मिळवला आहे. या कसोटी मालिकेमध्ये हिंदुस्थानी संघाने 3-0 असे निर्भेळ यश मिळवले असून त्यांनी पाहुण्या संघाला व्हाईटवॉश दिला आहे. हिंदुस्थानी संघाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 202 धावांनी पराभूत केले आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचे उरलेले दोन्ही बळी कसोटीत पदार्पण करणाऱ्या शाहबाज नदीमने टीपले आहेत. यातील लुंगी एनगिडी हा विचित्र पद्धतीने बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा खेळ खलास झाला. लुंगीने नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने मारलेला चेंडू हा पलिकडे असलेल्या अनरिच नोर्त्जे च्या मनगटानवर लागून हवेत उसळला. नदीमने सहजपणे झेट टीपला आणि अशा पद्धतीने दक्षिण आफ्रिकेसाठी तिसऱ्या कसोटीचा वेदनादायी शेवट झाला.

ज्या खेळपट्टीवर एकटय़ा रोहित शर्माने पहिल्या डावात 212 धावा चोपून काढल्या, त्याच रांचीच्या खेळपट्टीवर सोमवारी दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांना मिळून त्याच्याएवढय़ा धावाही जमविता आल्या नव्हत्या. तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ‘टीम इंडिया’च्या 497 (घोषित) धावांना प्रत्युत्तर देताना पाहुण्या संघाचा पहिला डाव 56.2 षटकांत 162 धावांत संपुष्टात आल्याने विराट सेनेला 335 धावांची मोठी आघाडी मिळाली. मग दक्षिण आफ्रिकेवर सलग दुसऱ्या कसोटीत फॉलोऑन लादून हिंदुस्थानने त्यांची सोमवारी दिवसअखेर उर्वरित 46 षटकांच्या खेळात 8 बाद 132 धावा अशी दाणादाण उडवली.

सोमवारचा खेळ थांबला तेव्हा थ्युनिस डी ब्रुयन 30, तर ऍनरिच नॉर्खिया 5 धावांवर खेळत होते. हिंदुस्थानी गोलंदाजांनी पावरफुल शो सादर करताना तब्बल 16 फलंदाजांना बाद करून सोमवारचा दिवस गाजविला होता. सोमवारी दुसऱ्या दिवसाच्या 2 बाद 9 धावसंख्येवरून पुढे खेळ सुरू केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हिंदुस्थानी गोलंदाजांपुढे सपशेल शरणागती पत्करली होती. उमेश यादवने कर्णधार फाफ डू प्लेसिसचा (1) त्रिफळा उडवून हिंदुस्थानला सकाळी सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र त्यानंतर झुबेर हमजा (62) व तेम्बा बावूमा (32) यांनी काही वेळ हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला. रवींद्र जाडेजाने हमजाच्या यष्टय़ा उडवून ही जोडी फोडली. मग पदार्पणवीर शाहबाझ नदीमने बावूमाला साहाकरवी यष्टिचित करून कसोटी बळीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर जाडेजाने हेन्रीक क्लासेनचे (6) दांडके उडवून हिंदुस्थानला सहावे यश मिळवून दिले. शेवटी जॉर्ज लिंडेने (37) ऍनरिक नॉर्खियाच्या (4) साथीने 32 धावांची भागीदारी केली म्हणून दक्षिण आफ्रिकेला दीडशेचा टप्पा ओलांडता आला. हिंदुस्थानकडून उमेश यादवने 3, तर मोहम्मद शमी, शाहबाझ नदीम व रवींद्र जाडेजा यांनी 2-2 बळी टिपले.

कोहलीने अझरुद्दीनचा विक्रम मोडला
विक्रमांचे इमल्यावर इमले रचत चाललेला ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर सोमवारी आणखी एक विक्रम जमा झाला. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने आठव्यांदा प्रतिस्पर्धी संघावर फॉलोऑन लादून मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने सात वेळा फॉलोऑन लादला होता. अझरुद्दीनने 47 कसोटी सामन्यांत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना ही उपलब्धी मिळविली होती. कोहलीने 51 व्या कसोटीत अझरुद्दीनचा हा विक्रम मोडला. महेंद्रसिंग धोनीने 60 सामन्यांत पाच वेळा, तर सौरव गांगुलीने 49 सामन्यांत 4 वेळा प्रतिस्पर्धी संघांवर फॉलोऑन लादला होता.

आपली प्रतिक्रिया द्या