बारामती विमान दुर्घटनेनंतर हवाई दलाची तातडीची मदत, लोहेगाव येथून हवाई वाहतूक नियंत्रण पथक तैनात

महाराष्ट्र सरकारच्या तातडीच्या विनंतीनंतर हिंदुस्थानी हवाई दलाने कारवाई करत लोहेगाव येथील हवाई दल तळ येथून हवाई वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांचे पथक तसेच आवश्यक तांत्रिक उपकरणे बारामती विमानतळावर पाठवली.

आज बारामतीत विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने हिंदुस्थानी हवाई दलाला ही विनंती केली होती. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पथकाने स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने तातडीने आपत्कालीन हवाई वाहतूक नियंत्रण सेवा कार्यान्वित केल्या. यामध्ये संपर्क व्यवस्था तसेच इतर आपत्कालीन सुविधा उभारण्यात आल्या असून, हवाई वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत राहण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

हवाई दलाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे आपत्कालीन व्यवस्थापन, बचावकार्य आणि पुढील हवाई हालचाली सुरक्षितपणे हाताळण्यास मदत मिळाल्याचेही संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.