‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू, योग्यवेळी माहिती देऊ; हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर हवाई दलाचं स्पष्टीकरण

हिंदुस्थान आणि पाकिस्तानने शनिवारी शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली. हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’चे काय होणार असा सवाल उपस्थित होत होता. आता याबाबत हिंदुस्थानच्या हवाई दलाने स्पष्टीकरण दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असून वेळ आल्यावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल, अशी माहिती हवाई दलाने आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करून दिली आहे.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान हवाई दलाने आपल्यावर दिलेली जबाबदारी अचूक आणि व्यावसायिकतेने बजावली आहे. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने हे ऑपरेशन विचारपूर्वक पार पाडण्यात आले. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याने योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे हवाई दलाने स्पष्ट केले.

22 एप्रिल रोजी जम्मू-कश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशन अंतर्गत हिंदुस्थानी लष्कर आणि वायूदलाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून 9 दहशतवादी तळ बेचिराख केले होते. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार करत तोफगोळे डागले. तसेच सलग दोन दिवस ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावत जोरदार प्रतिहल्ला केला. हिंदुस्थानने पाकिस्तानवर ड्रोन आणि लढाऊ विमानांद्वारे हल्ला करत हवाई तळ, दहशतवादी लॉन्च पॅड, ड्रोन लॉन्च पॅड आणि पाकिस्तानी चौक्या ध्वस्त केल्या. मात्र शनिवारपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला.

हिंदुस्थान पाकिस्तानच्या शस्त्रसंधीमुळे अनेक माजी सैन्यप्रमुख आश्चर्यचकित, या घडामोडींमुळे नेमकं साध्य काय झालं? माजी सैन्यधिकाऱ्यांचा सवाल