आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानची कोंडी

हिंदुस्थानी लष्कराने एक़िकडे युद्धभूमीवर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली असतानाच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही भारताने शत्रूविरोधात चर्चा आणि वादविवादांच्या माध्यमातून जोरदार मुसंडी मारली आहे. अमेरिका, इंग्लंड, युनोमध्ये भारताची जोरदार बाजू मांडत पाकिस्तानाच्या नापाक कारवायांचा बुरखा फाडण्याचे काम भारताचे राजनैतिक अधिकारी हिरीरीने करत आहेत. चॅनेलवरील किंवा अन्य व्यासपीठांवरील चर्चांच्या माध्यमातून पाक लष्कराचे दहशतवाद्यांशी असलेले लागेबांधे दाखविणारी छायाचित्रे, पुरावे सादर करून पाकिस्तानची पुरती कोंडी करणारे हे अधिकारी आहेत, विक्रम दोरायस्वामी, विनय क्वात्रा.

पाक लष्कराचा बुरखा फाडला

इंग्लंडमधील स्काल न्यूजला गुरुवारी मुलाखत देताना विक्रम दोरायस्वामी यांनी पाकिस्तान गेली 30 वर्षे भारतात दहशतवादाला कसे खतपाणी घालत आहे, हे पुराव्यानिशी मांडले. जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरचा भाऊ आणि कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाईंड अब्दुल रौफ अमेरिकेनेही दहशतवादी घोषित केले आहे. परंतु, तो पाकिस्तानी लष्करी अधिकाऱयांच्या समवेत उभा असल्याची छायाचित्रेच दोरायस्वामी यांनी न्यूज
चॅनेलवर मुलाखत देताना दाखविली. रौफचा मृतदेह नेणाऱया ताबूतवर पाकिस्तानी झेंडा कसा लपेटण्यात आला होता, त्याच्या जनाजाला पाक लष्करी अधिकारी कसे उपस्थित होते, याचीही छायाचित्रे दोरायस्वामी यांनी दाखविली. ही छायाचित्रे पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान कसे बनले आहे, याची खात्री देण्यासाठी पुरेसे आहे, असे सांगून त्यांनी पाक लष्कराचा बुरखा फाडला.

आमचे युद्ध दहशतवाद्यांशी

अमेरिकेत विनय क्वात्रा यांनी हिंदुस्थानची बाजू उचलून धरत पाकचा पर्दाफाश केला. आंतराराष्ट्रीय मीडियासमोर पाकची पोलखोल करताना त्यांनी दहशतवाद्यांशी पाक लष्कराचे असलेले संबंध दाखविणारी छायाचित्रे सादर केली. दहशतवाद्यांनी निर्दोष लोकांना त्यांच्या मुला-पत्नींच्या समोर मारले. आमची कारवाई दहशतवादाविरोधात आहे. त्यामुळे ती पूर्णपणे योग्य आणि न्यायाला धरून असल्याचे क्वात्रा यांनी सांगितले. आमचे युद्ध दहशतवाद्यांशी आहे आणि ही केवळ भारताची नव्हे तर संपूर्ण जगाची लढाई आहे. भारताविरोधात दहशतवादाचा वापर हे पाक आपल्या रणनितीचा भाग आहे, असे मानतो. आमच्या कारवाईला उत्तर देत पाकिस्ताने हे मान्य केले आहे, की तो दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे, अशा शब्दांत क्वात्रा यांनी भारताच्या कारवाईचे समर्थन केले.

वाहतूकदार संघटनेकडून लष्कराला 7.5 लाख ट्रक

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या वाहतूकदारांच्या संघटनेने सुमारे 7.5 लाख ट्रक भारतीय लष्कराला उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शवली आहे. असोसिएशनचे राज्य युनिट प्रमुख सी.एल. मुकाती यांनी या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. या कठीण काळात, देशाची सेवा करण्यासाठी आम्ही 7.5 लाख ट्रक सैन्याला मोफत पुरविण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले. 1999 च्या कारगिल युद्धादरम्यानही राज्यातील वाहतूकदारांनी महू येथील लष्करी छावणीला सुमारे एक हजार ट्रक दिले होते.