जम्मू कश्मिरमधील मशिदीची दुरुस्ती करण्यासाठी हिंदुस्थानी सैन्य सरसावले! पाकिस्तानच्या गोळीबारात स्थानिक मशिदीचे नुकसान

पाकिस्तानच्या गोळीबारानंतर हिंदुस्थानी सैन्याने छोटा गाव मोहल्ला, इबकोटला मदत केली आहे. मशिदीचे छप्पर, सौर प्लेट्स आणि प्रार्थना कक्षातील चटई अशा सर्व गोष्टी उद्धवस्त झाल्या होत्या. यानंतर हिंदुस्थानी सैन्याने सौर यंत्रणा दुरुस्त केली आणि चटई त्वरित बदलली. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे स्थानिक मशिदीचे नुकसान झाल्यानंतर हिंदुस्थानी सैन्याने जम्मूमधील छोटा गाव मोहल्ला आणि काश्मीरच्या इबकोट गावातील रहिवाशांना वेळेवर जाऊन तत्परतेने मदत केली. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामुळे मशिदीच्या छताचे, विशेषतः कोरुगेटेड गॅल्वनाइज्ड आयर्न (CGI) शीट्सचे, तसेच सोलर प्लेट सिस्टमचे आणि प्रार्थना कक्षाच्या आतील चटईचे खूप मोठे नुकसान झाले होते. या झालेल्या घटनेमुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या होत्या.

हिंदुस्थानी सैन्याने झालेले सर्व नुकसान लक्षात घेता, त्याठिकाणी तत्परतेने काम करण्यास सुरुवात केली. मशिदीचे छत दुरुस्त केले, सौर ऊर्जा प्रणाली पुनर्संचयित केली आणि खराब झालेल्या चटया अशा सर्व गोष्टी पुन्हा एकदा नव्याने करवुन दिल्या. त्यानंतर आता स्थानिकांकडून मशिदीमध्ये जाण्यास सुरुवात केली आहे.

सीमावर्ती भागातील रहिवाशांना मदत करण्याचा सैन्याच्या प्रयत्नामुळे, इबकोटच्या रहिवाशांनी आभार मानले. याचजोडीला इथल्या गावकऱ्यांनी सुरक्षा आणि पाठिंबा प्रदान करण्याठी सैन्याच्या बाजूने कबुली दिली. हिंदुस्थानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानावर विनाकारण हल्ला केला.