
येत्या 10 जून रोजी हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऑक्झिओम – 4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत. शुभांशू शुक्ला ड्रगन कॅप्सूलमधून अंतराळात जाणार आहेत. ड्रगन कॅप्सूल आहे तरी काय, ते जाणून घेऊया.
ड्रगन कॅप्सूल हे स्पेसेक्सचे अंतराळयान आहे. यामध्ये क्रू ड्रगन आणि कार्गो ड्रगनचा समावेश आहे. क्रू ड्रगनमधून अंतराळवीर अंतराळात जातात. तर कार्गो ड्रगन कॅप्सूलमधून वैज्ञानिक उपकरण आणि साहित्य घेऊन जातात. क्रू ड्रगन कॅप्सूलने पहिल्यांदा 2020 साली अंतराळयात्रींना घेऊन उड्डाण केले होते.
ड्रगन कॅप्सूलची किंमत 500 कोटी रुपये आहे. स्पेसेक्सच्या कॅप्सूलमधून सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात आले होते. हे यान आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला स्वतःहून जोडले जाते. त्यामुळे कोणतीही अंतराळ मोहीम राबवणे सोपे असते. क्रू ड्रगनला 15 मोहिमांच्या वापरापर्यंत डिझाईन करण्यात आले आहे. यात 8 सुपरड्रेंको इंजिन आहेत. त्याद्वारे आपत्कालीन स्थितीत कॅप्सूलला रॉकेटपासून वेगळे करता येते. कॅप्सूलच्या ट्रंक पॅनेलमध्ये सोलार पॅनेल लावण्यात आले आहे. त्यातून वीज तयार केली जाते. दरम्यान, अंतराळात जाणाऱ्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
- शुभांशु शुक्ला यांचे मिशन फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन 9 रॉकेटवर लाँच होईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 7 ते 9 शास्त्रज्ञ प्रयोग करतील.
- ऑक्झिओम स्पेसद्वारा ऑक्झिओम
- 4 मिशन चालवले जाते. कंपनीचे हे चौथे स्पेस मिशन आहे.
- शुभांशु यांच्यासोबत छोटा सॉफ्ट टॉय अंतराळात जाणार आहे. त्याचे नाव जॉय असे आहे. हे सॉफ्ट टॉय म्हणजे शून्य ग्रॅविटी इंडिकेटर आहे.