
ते शतक नव्हतं, तो एक धडा होता. 1992 सालच्या पर्थ कसोटीतील सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक खेळीबाबत माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांनी अशा शब्दांत आठवणींना उजाळा दिला. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान, उसळत्या आणि भेगांनी भरलेल्या खेळपट्टीवर, जागतिक दर्जाच्या गोलंदाजीसमोर साकारलेली सचिनची 114 धावांची खेळी ही आजही आपण पाहिलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक असल्याचे अमरे ठामपणे म्हणाले.
वॅकाचे मैदान जिथे चेंडू बॅटपेक्षा आधी छातीला भिडेल, अशी दहशत. आणि समोर व्रेग मॅकडरमॉट, मर्व्ह ह्यूजेस, पॉल राफेल यांचा मारा. त्या रणांगणात अवघ्या 18 वर्षांचा सचिन तेंडुलकर उभा राहिला आणि जगाला दाखवून दिलं की, काwशल्य आणि धैर्य वय पाहत नाही.
दूरदर्शनवरील ‘द ग्रेट इंडियन क्रिकेट शो’ मध्ये बोलताना अमरे म्हणाले, त्यादिवशी मी 12 वा खेळाडू होतो आणि सचिनचा रूममेटही. मी हे सगळं अगदी डोळ्यांनी पाहिलं. पिचवर इतक्या मोठय़ा भेगा होत्या की, सचिनने बॅट एका भेगेत ठेवली आणि तो सरळ उभा राहिला. अशा पिचवर जिथे चेंडू कुठेही जाऊ शकतो, तिथे त्याने दाखवलेली परिपक्वता त्याच्या वयाच्या कितीतरी पुढची होती. त्याच्या सर्व शतकांत पर्थचं शतक वेगळ्याच तोलामोलाचं आहे. अमरे पुढे म्हणाले, मी पाहिलेल्या सर्वोत्तम कसोटी सामन्यांपैकी तो एक सामना होता.
याच ऑस्ट्रेलिया दौऱयातून सचिनने ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी पदार्पण केलं. पाच कसोटी सामन्यांत नऊ डावांत 46.00 च्या सरासरीने 368 धावा करत तो हिंदुस्थानकडील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दोन शतके, 148 ङ अशी सर्वोत्तम खेळी आणि मालिकेत तिसऱया क्रमांकाची कामगिरी. मात्र मालिका ऑस्ट्रेलियाने 4-0 अशी खिशात घातली. पण याच मालिकेने एक नातं जन्माला घातलं, सचिन आणि ऑस्ट्रेलियन परिस्थिती यांचं. पुढे जाऊन या महान फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या भूमीत 20 कसोटी सामने, 38 डाव, 53.20 ची सरासरी, 1809 धावा, सहा शतके, सात अर्धशतके आणि नाबाद 241 धावांची सर्वोच्च खेळी अशी सुवर्णमुद्रा उमटवली.


























































