
हिंदुस्थानी क्रिकेटच्या अंगी आक्रमकता भिनवणारा, अवघ्या हिंदुस्थानी क्रीडाविश्वाला फिटनेसची प्रेरणा देणारा आणि मैदानात नेहमीच चैतन्य निर्माण करण्यासाठी धडपडणारा ‘क्रिकेटचा राजा’ अर्थातच विराट कोहली अचानक आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. क्रिकेटच्या या राजाने मैदानात लढता लढता निवृत्ती जाहीर करावी, अशी सर्वसामान्यांची भावना होती, पण नेहमीच स्वतःच्या मतांवर ठाम असलेल्या विराटने आपल्या 14 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीला निरोप दिला. आता तो हिंदुस्थानी संघासाठी केवळ एकदिवसीय क्रिकेटच खेळेल.
गेली पाच-सहा वर्षे विराट कोहलीचा आपल्या लौकिकास साजेसा कसोटीमध्ये खेळ करता आला नाही. तो चाचपडत होता, तो धडपडत होता. त्याला ऑफ स्टम्पचे चेंडू तर दानव वाटू लागले होते. तरीही तो क्रिकेटविश्वाला हवाहवासा वाटत होता. त्याने दोन दिवसांपूर्वी निवृत्तीची व्यक्त केलेली इच्छा माफक वाटत होती. हा राजामाणूस पुन्हा मैदानात उतरून आपला राजासारखा खेळ अवघ्या विश्वाला दाखवेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे कोहली निवृत्त होईल, असे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. आज त्याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या संघसहकाऱयांपासून क्रिकेटच्या दिग्गज आणि सामान्य क्रिकेटप्रेमींपर्यंत साऱयांनाच तो धक्का होता. त्याने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळावी. त्यानंतर हिंदुस्थानात दिल्लीत होणाऱया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत राजेशाही थाटात निवृत्ती स्वीकारावी, अशी अपेक्षा होती. पण विराट पुन्हा एकदा आपल्या मनाचे ऐकला आणि त्याने आपल्या भावी वारसदारासाठी आपले सिंहासन रिक्त केले.
– बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना विराटच्या निर्णयाचे वाईट वाटले. बीसीसीआयने कधीच कोणत्या खेळाडूवर निवृत्तीसाठी दबाव टाकला नाही. विराटवरही तो दबाव नव्हता. मात्र आम्हाला त्याच्या वैयक्तिक निर्णयाचा आदर असल्याचे त्यांनी सांगितले.
– क्रिकेटप्रेमींनाही आपल्या किंग कोहलीची निवृत्ती खटकली आहे. त्याने आपली निवृत्ती टी-20 क्रिकेटप्रमाणे मैदानातच घ्यायला हवी होती, अशी भावना क्रिकेटप्रेमींनी बोलून दाखवली.
आधी रोहित थांबला
हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्माने चार दिवसांपूर्वी अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर कोणाच्याही भुवया उंचावल्या नव्हत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी खुद्द विराटने बीसीसीआयकडे निवृत्तीची इच्छा व्यक्त केली तेव्हा अवघ्या क्रिकेटविश्वाच्या छातीत धस्स झालं होतं. वाटलं की या कोहलीची बीसीसीआयचे दिग्गज मनधरणी करतील. त्याला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास राजी करतील, पण तसे काहीच घडले नाही.