
ईशिकाच्या दोन झंझावाती गोलांच्या जोरावर हिंदुस्थानच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने मंगळवारी ऑस्ट्रेलियन क्लब कॅनबेरा चिलवर 3-1 अशी दमदार मात करून दौऱयातील दुसरा विजय नोंदवला.
ईशिकाने 13 व्या आणि 39 व्या मिनिटाला गोल केले, तर सोनमने 27 व्या मिनिटात निर्णायक गोल झळकावला. सामन्याच्या सुरुवातीला हिंदुस्थानला धक्का बसला होता. 11व्या मिनिटाला कॅनबेरा चिलसाठी नाओमी इव्हान्सने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करून आघाडी घेतली.
तथापि, हिंदुस्थानी संघाने लगेचच जोरदार पलटवार केला. फक्त दोन मिनिटांतच ईशिकाने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करून स्कोर 1-1 असा बरोबरीत आणला.
यानंतर मध्यंतरापूर्वीच सोनमने मैदानी गोल करत हिंदुस्थानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱया क्वार्टरमध्ये ईशिकाने आपला दुसरा गोल झळकवत आघाडी 3-1 अशी भक्कम केली.
हिंदुस्थानी संघाने या दौऱयात आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी दोन जिंकले आणि दोन गमावले आहेत. संघ आता गुरुवारी कॅनबेरा चिलविरुद्ध अंतिम दौरा सामना खेळणार आहे.


























































