कॅनडा: हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, पोलिसांना टार्गेट किलिंगचा संशय

पंजाबमधील लुधियाना येथील हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची शुक्रवारी कॅनडातील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव युवराज गोयल असल्याचं सांगण्यात आलं आहे. 2019 मध्ये स्टुडंट व्हिसावर तो कॅनडामध्ये आला होता आणि त्याला नुकताच कॅनेडियन परमनंट रेसिडेंट (PR) दर्जा मिळाला होता.

28 वर्षीय युवराज सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. त्याचे वडील राजेश गोयल सरपण व्यवसाय करतात, तर आई शकुन गोयल गृहिणी आहेत. युवराजचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याची माहिती आहे आणि त्याच्या हत्येचा हेतू अद्याप समोर आलेला नाही, असं रॉयल कॅनेडियन पोलिसांनी सांगितलं.

ही घटना 7 जून रोजी सकाळी 8:46 वाजता घडली. यानंतर सरे पोलिसांना, ब्रिटीश कोलंबिया येथील 164 स्ट्रीटच्या 900-ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याचा कॉल आला. त्यानंतर अधिकाऱ्यांना युवराज मृत झाल्याचं आढळलं. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

संशयित, मनवीर बसराम (23), साहिब बसरा (20), आणि सरे येथील हरकिरत झुट्टी (23) आणि ओंटारियो येथील केलॉन फ्रँकोइस (20) यांच्यावर शनिवारी खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

युवराजच्या हत्येमागची कारणे शोधली जात असली तरी या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात गोळीबार टार्गेट करण्यात आल्याचे समजते.