एचएस प्रणॉय व समीर वर्मा या हिंदुस्थानी खेळाडूंनी गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता आगामी लढतीत प्रणॉयची गाठ द्वितीय मानांकित जपानच्या कोडाई नारोआका याच्याशी, तर समीरची गाठ चिनी तैपेईच्या चुन-यी लिन याच्याशी पडेल.
पाचव्या मानांकित एचएस प्रणॉयने इस्रायलच्या मीशा जिल्बरमनचा 21-17, 21-15 असा पराभव केला. हिंदुस्थानी खेळाडूने अवघ्या 46 मिनिटांत ही लढत जिंकली. समीर वर्माने आठव्या मानांकित सिंगापूरच्या लोह कीन यू याचा कडवा प्रतिकार 21-14, 14-21, 21-19 असा मोडून काढला. ही लढत एक तास 2 मिनिटांपर्यंत रंगली. मात्र, हिंदुस्थानच्या किरण जॉर्जचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याला सातव्या मानांकित जपानच्या पेंटा निशिमोटो याने 22-20, 21-16 असे पराभूत केले.
ग्रेटर मुंबई अमॅच्युअर अक्वॉटिक असोसिएशनच्या वतीने चर्नी रोड येथील हिंदू बाथ जलतरण जलावात पार पडलेल्या 17 वर्षांखालील ज्युनिअर वॉटर पोलो स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम सामन्यात दादरच्या महात्मा गांधी स्मारक जलतरण तलावाच्या मुलींच्या संघाने बाजी मारत सुवर्णपदक पटकावले तर वरळीतील पोलीस जलतरण तलावाच्या संघाने रौप्यपदक जिंकले. यावेळी विजयी संघातील स्पर्धकांसह पंच प्रभात अगरवाल, अश्विनीकुमार कुंडे, सचिव तेजस पाठारे, ऑल इंडिया रेल्वे वॉटरपोलो प्रशिक्षक अरुण मिश्रा उपस्थित होते.