नव्या कर्णधारांचा लागणार कस; पंजाबची गाठ कोलकात्याशी

अवघ्या जगातील क्रिकेटप्रेमींना भुरळ घालणाऱया आयपीएलच्या 16 व्या मोसमाची दणक्यात सुरुवात झाली. पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स एकमेकांशी भिडणार आहेत आणि तेसुद्धा नवे कर्णधार आणि नव्या प्रशिक्षकांसह. गेला मोसम या दोन्ही संघांसाठी फारच भयावह होता, पण नव्या कर्णधारांसह नव्या जोशात उतरण्यासाठी पंजाब आणि कोलकाता सज्ज झालीय.

शिखर धवन प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिससह आपल्या पंजाबला किंग बनवण्यासाठी नव्या रणनीतीसह येतोय. दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे नितीश राणाच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आलीय. तोसुद्धा चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे.

पंजाबची फलंदाजीची ताकद असलेला जॉनी बेअरस्टॉ माघारी परतलाय. तसेच लियाम लिव्हिंगस्टोन आणि कॅगिसो रबाडा सलामीच्या सामन्याला मुकणार आहेत. त्यामुळे पंजाबला त्यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे. तसेच कोलकाता शकीब अल हसन आणि लिटन दासच्या अनुपस्थितीत भिडतील. पंजाबचा संघ 2014 नंतर एकदाही प्ले ऑफपर्यंत पोहचू शकलेला नाही. गेल्या आठ मोसमातील अपयश धुऊन काढण्याची जबाबदारी शिखर धवनवर आहे. या अपयशी संघांना आपली सुरुवात दमदार करायची आहे.

लखनौ आणि दिल्लीसमोर खेळाडूंचे आव्हान

लखनौ आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात उभय संघ तीन-तीन परदेशी खेळाडूंसह उतरण्याची शक्यता आहे. त्यांचे अनेक परदेशी खेळाडू अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे त्यांच्यासमोर हे आव्हान उभे ठाकले आहे. लखनौ संघात के. एल. राहुल आणि क्विंटन डिकॉक हे दोन यष्टिरक्षक आहेत. सलामीच्या सामन्यात डिकॉक नसेल. त्यामुळे राहुल यष्टीमागे दिसेल. दिल्ली ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत उतरणार असल्यामुळे त्यांची ताकद निश्चितच कमी झाली आहे, पण डेव्हिड वॉर्नरमुळे दिल्लीला नक्कीच बळकटी मिळेल. पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्शचा झंझावात प्रत्यक्षात पाहायला मिळाला तर दिल्लीला विजयापासून कुणीही रोखू शकणार नाही.

आजच्या लढती

पंजाब वि. कोलकाता

स्थळ  मोहाली, वेळ  दुपारी 3.30

लखनौ वि. दिल्ली

स्थळ  लखनौ, वेळ  सायं. 7.30.