जगभरात कोरोना सारख्या महाभयंकर माहामारीने चार वर्षांपूर्वी लोकांचे हाल केले होते. परिणामी संपूर्ण जगात लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र या लॉकडाऊनचा परिणाम लोकांसह ग्रहांवर देखील झाला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 2020 साली कोरोना काळातील लॉकडाऊन प्रभाव चंद्रापर्यंत पोहोचला आहे. संशोधकांनाही केलेल्या संशोधनात याबाबत काही पुरावे मिळाले आहेत.
रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या मासिक नोटिसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासिकेत याबाबत माहिती देण्यात आली आहे. एप्रिल-मे 2020 च्या कडक लॉकडाऊन कालावधीत चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात असामान्य घट दिसून आल्याचे यात म्हटले आहे. भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे संशोधक दुर्गा प्रसाद आणि जी अंबिली यांनी 2017 आणि 2023 दरम्यान, चंद्राच्या जवळच्या सहा वेगवेगळ्या ठिकाणावरील पृष्ठभागाच्या तापमानाचे विश्लेषण केले. लॉकडाऊन दरम्यान तापमान इतर वर्षांच्या तुलनेत 8-10 केल्विनने कमी झाल्याचे त्यांना आढळले. याच्या अधिक तपासासाठी संशोधकांनी नासाच्या लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) कडील माहितीची मदत घेतली.
पीआरएलचे संचालक अनिल भारद्वाज यांनी त्यांच्या टीमने केलेले हे अत्यंत महत्त्वाचे संशोधन असल्याचे म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळात जगभरातील सर्व कारखाने, गाड्या आणि इतर प्रदूषण करणाऱ्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. लोकांना देखील घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. या काळात रेडिएशनमध्ये लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये चंद्रावरील तापमानात लक्षणीय घट झाली, असे संशोधकांचे मत आहे.
संशोधकांनी 12 वर्षांच्या संपूर्ण डेटाचा अभ्यास केला आहे. त्यांनी त्यांच्या संशोधनासाठी यामधील सात वर्षांचा (2017-2023) डेटा वापरला आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या तीन वर्षांपूर्वी आणि तीन वर्षानंतरच्या तापमानाचा अभ्यास केला आहे. दरम्यान 2020 मध्ये साइट-2 चे सर्वात कमी तापमान 96.2 के होते, तर 2022 मध्ये साइट-1 चे सर्वात कमी तापमान 143.8 के इतके होते. पण लॉकडाऊन संपताच चंद्रावरील उष्णता वाढू लागली, असे संशोधनात आढळलून आले.