
जागतिक बाजारातील घडामोडी आणि आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा हिंदुस्थानी चलनाला मोठा फटका बसला आहे. रुपयाची आज ऐतिहासिक घसरण झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 93.24 इतक्या सर्वात नीचांकी पातळीवर पोचला. तेलाचे वाढते आयात बिल आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून हिंदुस्थानी बाजारातून सतत पैसे काढल्यामुळे रुपयात ही घसरण झाली.
रुपया आज डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच 93 च्या पातळीला ओलांडून गेला. व्यवहारादरम्यान तो 93.24 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला होता, मात्र त्यानंतर तो थोडा सावरत 93.12 वर आला. या महिन्याच्या सुरुवातीला रुपया 92 च्या पातळीवर होता.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षामुळे आणि ऊर्जा पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्यामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीने ‘ब्रेंट क्रूड’चे दर प्रति बॅरल 110 डॉलर्सच्या वर गेले आहेत. हिंदुस्थान आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो, ज्यासाठी आपल्याला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. तेल महाग झाल्यामुळे डॉलरची मागणी वाढली आणि रुपया कमकुवत झाला.
विदेशी गुंतवणूकदारांची माघार
- विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार हिंदुस्थानच्या शेअर बाजारातून मोठय़ा प्रमाणावर आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. पैसे काढताना ते रुपयाचे रूपांतर डॉलरमध्ये करत असल्यामुळे रुपयाची घसरण आणखी वेगवान झाली आहे.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने परकीय चलन बाजारात हस्तक्षेप करत आहे. बँक आपल्या परकीय चलन साठय़ातून डॉलर विकून रुपयाची घसरण थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.
खिशावर भार
रुपया कमकुवत झाल्याने हिंदुस्थानासाठी आयात महाग होईल. कच्च्या तेलासारख्या वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. याशिवाय, परदेशातून आयात केले जाणारे मोबाईल, लॅपटॉप यांसारखे इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग होतील, परदेशातील शिक्षण महाग होईल, देशाचा विकास दर कमी होईल.






























































