
मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची आठवड्याची सुरुवात मंदीने झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीमुळे जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. परदेशातून मिळणाऱ्या या नकारात्मक संकेतांमुळे बाजार दबावाखाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड योजनेला विरोध करणाऱ्या युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी दिल्याने आशियाई शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू झाले आहे. जपानच्या निक्केईपासून ते हाँगकाँगच्या हँगसेंगपर्यंत, शेअर बाजार कोसळला आहे. तर देशात बाजाराची सुरुवात होताच घसरणीला सुरुवात झाली. तसेच गिफ्ट निफ्टीही सुमारे १०० अंकांनी घसरत आहे. मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स सुरुवातीला ५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर एनएसई निफ्टी देखील १५० पेक्षा जास्त अंकांनी घसरला.
ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठा अडचणीत आल्या आहेत. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या धमकीचा परिणाम आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी सोमवारी जगभरातील शेअर बाजारांवर झाला. जपानचा निक्केई ५२५ अंकांनी घसरून ५३,४१२ वर व्यवहार करत होता, तर हाँगकाँगचा हँगसेंग १९० अंकांनी घसरून २६,६६० वर व्यवहार करत होता. अमेरिकन बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. शुक्रवारी डाऊ फ्युचर्स ३३२ अंकांनी घसरून ४९,०२७ वर बंद झाला, डाऊ जोन्स ८३ अंकांनी घसरून ४९,३८० वर बंद झाला आणि एस अँड पी ६,९६० वर किंचित घसरून बंद झाला.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले, तर सोमवारी आशियाई बाजारातील घसरणीचा थेट परिणाम भारतावर झाला. उघडताच बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ५०० अंकांपेक्षा जास्त घसरून ८३,०२८ वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी देखील १५० अंकांपेक्षा जास्त घसरून २५,५२८ वर पोहोचला. ट्रम्प यांच्या टॅरिफचा तणाव कायम राहिला तर केवळ युरोपच नाही तर इतर देशांनाही नुकसान सहन करावे लागेल. त्याचा थेट परिणाम या देशांमधील व्यापार, अर्थव्यवस्था आणि जागतिक पुरवठा साखळीवर होतो.




























































