
हिंदुस्थानी शेअर बाजारात आज मोठी उसळी पाहायला मिळाली. सकाळपासूनच गुंतवणूकदारांमध्ये दिसून आलेल्या उत्साहामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी दमदार कामगिरी केली. या जबरदस्त तेजीमुळे अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ६.५० लाख कोटी रुपयांची भर पडली असून, बाजार भांडवलाने मोठी झेप घेतली आहे.
बाजारातील या उत्साहामागे प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेतून मिळालेले सकारात्मक संकेत कारणीभूत ठरले. अमेरिकन आणि आशियाई बाजारांमध्ये झालेल्या मजबुतीचा थेट फायदा हिंदुस्थानी निर्देशांकांना झाला. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट हिंदुस्थानसारख्या अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक ठरली. ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिकच वाढला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) पुन्हा एकदा हिंदुस्थानी शेअर्समध्ये खरेदीचा ओघ सुरू केल्याने बाजाराला मोठे बळ मिळाले.
विशेषतः बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज शेअर्सनी आज बाजाराचे नेतृत्व केले. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.

























































