सिराज जखमी! हिंदुस्थानला मोठा धक्का, द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी चिंता वाढली

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला रविवारी दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱया अनऑफिशियल कसोटीत चौथ्या दिवशी हाताला दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले.

सिराज क्षेत्ररक्षणादरम्यान स्वतःच्या उजव्या हाताला दुखापत करून घेतली आणि तीव्र वेदनांमुळे त्याला थेट डगआऊटमध्ये परतावे लागले. ही दुखापत अधिक गंभीर ठरू शकते. कारण हिंदुस्थानचा मुख्य दौरा फक्त काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि हाच सामना मालिकेची पूर्वतयारी मानली जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सिराजच्या उजव्या हातावर ही दुखापत झाली असून संघाचा फिजिओ तत्काळ मैदानात धावून आला. सध्या बीसीसीआयकडून अधिपृत निवेदन आलेले नाही, मात्र जर सिराज फिट झाला नाही तर आकाश दीप त्याचा संभाव्य पर्याय ठरू शकतो.

सिराज हा सध्या जसप्रीत बुमरानंतर हिंदुस्थानचा दुसरा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज मानला जातो. त्यामुळे त्याचे बाहेर पडणे हा संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

दरम्यान, या मालिकेत ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांची जोडीही चर्चेत आहे. जुरेलने दोन शतके झळकावत आपली दावेदारी अधिक बळकट केली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत पंतसोबत त्यालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.