
प्रीती पवार, प्रिया आणि अरुंधती चौधरी या हिंदुस्थानी महिला खेळाडूंनी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. या तिन्ही खेळाडूंच्या पदकांचा रंग कोणता असेल याबाबतची उत्सुकता आता टिपेला पोहोचली आहे.
हिंदुस्थानची स्टार बॉक्सर प्रीती पवार हिने 54 किलो गटात पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती एजी इम हिला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स सुवर्णपदक विजेती प्रीतीने अत्यंत संयमी आणि अचूक खेळ करत इमवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. आता ती अंतिम फेरीत चायनीज तैपेईच्या हुआंग ह्सियाओ-वेन हिच्याशी भिडणार आहे. हुआंग ही तीन वेळा विश्वविजेती (2019, 2023, 2025) आणि टोकियो
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आहे.
60 किलो गटात प्रिया हिने मंगोलियाच्या नामून मोन्खोर हिला 5-0 अशा एकतर्फी फरकाने हरवत फायनलमध्ये प्रवेश केला. आता तिचा सामना उत्तर कोरियाच्या उन ग्योंग वोन हिच्याशी होणार आहे. महिलांच्या 65 किलो गटात हिंदुस्थानच्या अंकुशिता बोरो हिला चायनीज तैपेईच्या निएन-चिन चेनकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीनंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने सामना थांबवण्यात आला आणि त्यानंतर गुणांच्या आधारे निकाल देण्यात आला. 70 किलो गटात अरुंधती चौधरीने उझबेकिस्तानच्या ओयशा तोइरोवा हिला 4-1 अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. आता ती कझाकस्तानच्या बकित सैदिश हिच्याशी सुवर्णपदकासाठी सामना करणार आहे.
निखत, लव्हलिना, पूजा पराभूत
हिंदुस्थानची स्टार बॉक्सर निखत झरीन हिला 51 किलो गटात चीनच्या विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती वू यू हिच्याकडून 0-5 असा पराभव स्वीकारावा लागला. 75 किलो गटात लव्हलिना बोरगोहेन हिला उझबेकिस्तानच्या अझिझा झोकीरोवा हिच्याकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. 80 किलो गटात पूजा रानीला कझाकस्तानच्या नादेझ्दा रायबेत्स हिच्याकडून 0-5 असा पराभव झाला आणि तिचा स्पर्धेतील प्रवास येथेच संपला.




























































