
एअर न्यूझीलंड कंपनीने देशांतर्गत उड्डाणांसाठी एका बाजूचे भाडे 10 न्यूझीलंड डॉलरने वाढवले आहे, तर शॉर्ट–हॉल आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी 20 डॉलर आणि लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी 90 डॉलरची वाढ केलीय. हाँगकाँग एअरलाइन्सने इंधन अधिभारात 35.2 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
एअरलाइन कंपनी इंडिगोच्या विमानाचे तिकीट गुरुवारपासून महाग झाले आहे. एअरलाइनने देशांतर्गत उड्डाणांवर 950 रुपयांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 10 हजार रुपयांपर्यंतचे अतिरिक्त इंधन शुल्क म्हणजेच फ्युल चार्ज लावले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे आता आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी 10 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.
इंडिगोने अवघ्या 18 दिवसांत दुसऱ्यांदा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्युल सरचार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कंपनीने 14 मार्च रोजी भाडय़ात वाढ केली होती. जेट इंधनाच्या किमती वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात इंधनाच्या किमतीत 130 टक्के वाढ झाली आहे. खर्च वाढण्याचे एक मोठे कारण करवाढदेखील आहे. बुधवारी राज्यसभेत विमान इंधनावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावांतर्गत 26 मार्च 2026 च्या अधिसूचनेला मंजुरी देण्यात आली आहे.
आता फायनान्स अॅक्ट 2002 मध्ये बदल करून एटीएफवर प्रति लिटर 50 रुपये अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाईल. तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या या अचानक बदलामुळे एअरलाईन्सचे बजेट बिघडले आहे. नागरिक उड्डान मंत्रालयाने एअरलाईन्सना संपूर्ण भार ग्राहकांवर टाकण्यापासून रोखले आहे. सरकारने सध्या देशांतर्गत विमानांसाठी केवळ भाडय़ावर 25 टक्के वाढीलाच परवानगी दिली आहे.






























































