हिंदुस्थानी विमान कंपन्याच्या विमानांना येणाऱ्या बॉम्बच्या धमक्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. अशातच शनिवारी पुन्हा 10 वेगवेगळ्या विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली आहे. यातील पाच उड्डाणे इंडिगोची आणि पाच उड्डाणे आकासा एअरलाइन्सची आहेत. सातत्याने येणाऱ्या या धमक्यांमुळे विमान वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, सातत्याने येणाऱ्या धमक्यांवर इंडिगो विमान कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. ‘मुंबईहून इस्तंबूलला जाणारी फ्लाइट क्रमांक 6E 17 संबंधित स्थितीबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता आमचे प्रवासी आणि आमचे क्रू मेंबर्स यांची सुरक्षा ही आमची प्रथम जबाबदारी असेल. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहोत. तसेच मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व आवश्यक खबरदारी घेत आहोत’, असे या निवेदनात म्हटले आहे.
या आठवड्यात विमान कंपन्यांना मिळाल्या 70 धमक्या
सोमवारपासून आतापर्यंत हिंदुस्थानी विमान कंपन्यांच्या सुमारे 70 विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. मात्र, चौकशीदरम्यान या अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र या अफवांमुळे विमानांचे मार्ग बदलून त्यांच्या वेळेत बदल करावा लागला. विमान कंपन्याना येणाऱ्या बॉम्बच्या खोट्या धमकीच्या घटना थांबवण्यासाठी नागरी विमान मंत्रालय अनेक योजना आखत आहे. खोट्या धमक्या पोहोचवणाऱ्या गुन्हेगारांना ‘नो-फ्लाय’ यादीत टाकण्यासह कठोर नियम लागू करण्याची योजना आखत आहे. या यादीचा उद्देश संशयित प्रवाशांना ओळखणे आणि त्यांना विमानातून प्रवास न करू देणे हा असणार आहे.