
अमेरिकेमध्ये नेव्हल अकादमीमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. यूएस नेव्हल अकादमी येथे ही घटना घडली असून, यावेळी गोळीबारात अनेक कॅडेट्स आणि नागरिक जखमी झाले. पोलिसांनी संपूर्ण कॅम्पस सील केला असून, हल्लेखोराचा शोध सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, मेरीलँडमधील नौदलाचा तळ आणि अकादमी दोन्ही लॉकडाऊन करण्यात आले आहेत. जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत कोणालाही आत किंवा बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, यूएस नेव्हल अकादमीमध्ये तैनात असलेल्या एका मिडशिपमनने विद्यार्थ्यांना ईमेल पाठवून इशारा दिला की, “ताबडतोब आत जा आणि दरवाजा बंद करा. हा ड्रिल नाही.” मेरीलँडमधील अॅनापोलिस येथील नेव्हल अकादमी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. अकादमीचे प्रवक्ते लेफ्टनंट नवीद लेमर म्हणाले, “सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण तळ लॉकडाऊन करण्यात आला आहे. हे प्रकरण अजूनही सुरू आहे आणि वेळोवेळी अपडेट्स दिले जातील.”
वृत्तानुसार, १६०० हून अधिक मिडशिपमन राहत असलेल्या बॅनक्रॉफ्ट हॉलमध्ये गोळीबाराचे आवाज ऐकू आले. तथापि, अद्याप कोणत्याही जीवितहानीला अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेडीव्हॅक हेलिकॉप्टर कॅम्पसमध्ये उतरताना दिसत आहे, परंतु त्याची पुष्टी झालेली नाही. मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले की परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. सध्या नौदल अकादमीला कोणताही मोठा धोका नाही.”
संरक्षण विभागाने लॉकडाऊनबद्दल माहिती दिली आहे, परंतु जास्त तपशील शेअर केलेला नाही. त्याच वेळी, एनसीआयएस (नौदल गुन्हेगारी तपास सेवा) आणि मेरीलँड राज्य पोलिसांनीही अॅनापोलिस पोलिसांसह तपास आणि कारवाई सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना संयम राखण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.