सिंधु जल करार तीन टप्प्यांत तोडणार

सिंधु जल करार रद्द करण्याबद्दल जलशक्ती मंत्रालयाची आज बैठक झाली. हा करार तीन टप्प्यांत तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची रणनीती आखण्यात आल्याची माहिती जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी बैठक झाली. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही उपस्थित होते.

हल्ल्यानंतर हिंदुस्थान आक्रमक, अरबी समुद्रात आयएनएस विक्रांत तैनात

दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आता हिंदुस्थानने स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात केली आहे. पाकिस्तान याच भागात क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करत असल्याचेही वृत्त आहे. आयएनएस विक्रांतने बंदर सोडले असून जहाज सध्या कर्नाटकातील कारवार किनाऱयाजवळ गस्त घालत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पश्चिम समुद्रकिनाऱयावर हिंदुस्थानी नौदलाने गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

माझ्या मुलाला घरी आणा; बीएसएफ जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश

पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात असलेल्या बीएसएफ जवान पूर्णम साहू याला सोडवून आणा, अशी आर्त मागणी जवानाच्या कुटुंबीयांनी केली आहे. पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या 182 व्या बटालियनमध्ये तैनात असलेले पूर्णम साहू बुधवारी चुकून सीमा ओलांडून पाकच्या हद्दीत घुसले. त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी ताबडतोब ताब्यात घेतले. पहलगाम हल्ल्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तानातील तणाव वाढला असून साहू यांच्या सुटकेकरिता त्यांचे कुटुंबीय सरकारची याचना करत आहेत. साहू प. बंगाल येथील हुगळी जिह्यातील रहिवासी आहे.

अटारी बॉर्डरवर पाकिस्तानीची गर्दी

हिंदुस्थान सरकारच्या आदेशानुसार पाकिस्तानातून आलेले पर्यटक परतण्यास सुरुवात झाली आहे. अटारी बॉर्डरवर सैन्यदलाकडून अतिशय कठोर पवित्रा घेतला जात आहे. व्हीसा संपण्यापूर्वी पाकिस्तानला परतणाऱ्या महिलांना अटारी आणि वाघा बॉर्डरवर रोखण्यात आले. तर त्यांच्या मुलांना पाकिस्तानला पाठवण्यात आले. या महिलांनी त्या हिंदुस्थानात वाढल्या असून त्यांचे सासर पाकिस्तानात आहे. माहेरच्यांना भेटण्यासाठी हिंदुस्थानात आलो आहोत, असे त्या म्हणाल्या. परंतु, त्यांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली गेली नाही.